११६ प्राण्यांचे झाले पुनर्वसन, तर ३० प्राण्यांना घेतले दत्तक; कॅपने सादर केला एका वर्षाचा लेखाजोखा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 17, 2022 10:12 PM2022-09-17T22:12:39+5:302022-09-17T22:13:22+5:30
पशू क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संपूर्ण वर्षभरात ११६ उपचार केलेल्या प्राण्यांचे पुनर्वसन केले तर ३० प्राण्यांना दत्तक देण्यात कॅप फाउंडेशनला यश आले. दत्तक घेणाऱ्या प्राणीप्रेमींनी श्वान, मांजरी, ससे आणि गिनिपिक्स यांना आपल्या कुटुंबात स्थान दिले. त्याचवेळी पशू क्रूरतेचे प्रमाण वाढत आहे. वर्षभरात १०८० पशू क्रूरतेच्या गुन्ह्यांची नोंद कॅप फाउंडेशनकडे झाली. प्राण्यांचे पुनर्वसन आणि उपचारासाठी काम करणाऱ्या ठाण्यातील कॅप फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एका वर्षात कॅपने प्राण्यांसाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा प्राणीप्रेमींसमोर सादर केला.
प्राण्यांवरील अन्याय, अत्याचाऱ्यांच्या केस वाढत आहेत. त्यातच प्राण्यांना खाद्य देऊ नये, यासाठी सोसायटीमध्ये वाद उद्भवतात. याच्या किमान पाच तक्रारी दिवसाला येतात. असे असताना कॅपमध्ये उपचार घेतलेल्या निरोगी प्राण्यांना दत्तक घेण्याचे आवाहन संस्थेकडून केले जाते. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दत्तक घेण्याची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षी १३ प्राण्यांना दत्तक घेतले होते. यंदा ३० प्राण्यांना घेतले आहे. प्राण्यांना जनजागृतीअभावी दत्तक घेणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याची खंत कॅप फाउंडेशनचे सुशांक तोमर यांनी व्यक्त केली. पहिल्या वर्षी खूपच कमी प्रमाणात प्राण्यांचे रिपोर्ट संस्थेकडे येत होते; परंतु कॅपच्या कामाविषयी प्राणीप्रेमींमध्ये जागरुकता वाढली, तसे त्यांच्याकडे तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले.
कॅपने शेल्टर बांधण्याला प्राधान्य दिले. त्यात श्वान, मांजरी, घोडे, गाढव, ससे, बैल, गाय यांसारख्या अनेक प्राण्यांना निवारा देण्यात आला. यावर्षी कॅपने २१ हजार ९३१ प्राण्यांना मदत केली. काहींना प्रत्यक्ष मदत केली तर काहींना फोनवरून मार्गदर्शन केले. १०३७ प्राण्यांचे लसीकरण, २०७ प्राण्यांची नसबंदी, १,८३६ प्राण्यांचे जागीच उपचार, ६१ प्राणी शेल्टरमध्ये उपचार घेतले जात आहेत. शनिवारी कॅप फाउंडेशनने त्यांचा वर्धापन दिन साजरा करताना त्यांनी प्राण्यांसाठी बांधलेल्या निवारा केंद्रात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काही प्राणीप्रेमींनी तेथे उपचार घेत असलेल्या प्राण्यांसोबत वेळ घालवला. गेल्या तीन वर्षांत कॅपला सहकार्य करणाऱ्यांची तसेच, स्वयंसेवकांची संख्या वाढत आहे. पशू क्रूरतेच्या घटना अजूनही कमी झाल्या नसल्याचे कॅपचे संस्थापक अध्यक्ष तोमर यांनी सांगितले.
११६ प्राण्यांचे झाले पुनर्वसन, तर ३० प्राण्यांना घेतले दत्तक;
— Lokmat (@lokmat) September 17, 2022
कॅपने सादर केला एका वर्षाचा लेखाजोखा#thanepic.twitter.com/7KfnKSdZTI