जिल्ह्यातील ११७६८१० विद्यार्थी आॅनलाइन
By admin | Published: October 12, 2015 04:44 AM2015-10-12T04:44:10+5:302015-10-12T04:44:10+5:30
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लागू केलेल्या ‘सरल प्रणाली’ या पद्धतीद्वारे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आॅनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लागू केलेल्या ‘सरल प्रणाली’ या पद्धतीद्वारे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आॅनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. यानुसार, जिल्ह्यातील १५ लाख विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ११ लाख ७६ हजार ८१० विद्यार्थ्यांचा डाटा आॅनलाइन लोड करण्यात आला आहे.
जिल्ह्यात चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, त्यांच्या अध्यापनाची जबाबदारी ३९ हजार ८८४ शिक्षक पार पाडत आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राची इत्थंभूत माहिती लवकरच आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शाळांद्वारे वैयक्तिक माहिती लोडिंग- अनलोडिंगचे काम सुरू आहे.
शाळेची इमारत, त्यातील सोयीसुविधांची नोंददेखील आॅनलाइन केली आहे. ३९ हजार ८८४ शिक्षकांनी शिक्षण घेतलेली शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक प्रगती, प्राप्त अॅवॉर्ड, नोकरीचे आदेश, चारित्र्य पडताळणी, सेवानिवृत्ती आदी माहिती या आधीच आॅनलाइन लोड केलेली आहे.
याप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये पालकांचा व्यवसाय, पत्ता, विद्यार्थ्यांची जनरल रजिस्टरमधील संपूर्ण माहिती, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आदी क्षेत्रांतील त्याची प्रगती, प्राप्त शिष्यवृत्ती, प्रगत महाराष्ट्राद्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये त्याने प्राप्त केलेले गुण, श्रेणी आदी शैक्षणिक कालावधीतील इत्थंभूत माहिती आॅनलाइन उपलब्ध केली आहे.
यानुसार, आतापर्यंत ११ लाख ७६ हजार ८१० विद्यार्थ्यांना आॅनलाइन केले आहे. उर्वरित तीन लाख ३९ हजार ४८५ विद्यार्थ्यांची माहिती आगामी दोन दिवसांत आॅनलाइन लोड केली जाणार आहे.