१२ बस टायरच्या प्रतीक्षेत

By admin | Published: March 27, 2017 05:56 AM2017-03-27T05:56:35+5:302017-03-27T05:56:35+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासून दुसऱ्या टप्प्यात खरेदी केलेल्या ४८ पैकी १२ बस दोन

12 bus waiting for tires | १२ बस टायरच्या प्रतीक्षेत

१२ बस टायरच्या प्रतीक्षेत

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासून दुसऱ्या टप्प्यात खरेदी केलेल्या ४८ पैकी १२ बस दोन महिन्यांपासून टायरविना जागेवरच उभ्या आहेत. या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायीने ७ मार्चच्या बैठकीत टायरखरेदीला मान्यताही दिली. मात्र, ठरावावर स्थायी सभापतींनी स्वाक्षरीच केली नसल्याने टायर खरेदी लांबल्याचे समोर आले आहे.
पालिकेने दुसऱ्या टप्प्यात १०० नवीन बसखरेदीला केंद्राने मंजुरी दिली. त्यातील ५ वातानुकूलित बससह मिनी व साधारण अशा एकूण ४८ बससेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांचे लोकार्पण २५ सप्टेंबर २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या बसची सेवा अधिक झाल्याने त्यांचे टायर खराब झाले. त्यामुळे ते वापरणे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने त्या बस प्लेझंट पार्क येथे उभ्या केल्या आहेत.
दोन महिन्यांपासून टायरविना एकाच जागी उभ्या असलेल्या बस नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टायरखरेदीसाठी विभागाने अनेकदा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर फेब्रुवारीच्या शेवटी निविदा प्राप्त झाल्या. त्याचे सोपस्कार निविदा निवड समितीने पार पाडल्यानंतर त्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ७ मार्चच्या बैठकीत सादर करण्यात आल्या. त्यातील मेसर्स शक्ती साई टायर्स प्रा.लि. या कंपनीच्या सुमारे २० लाखांच्या अंदाजे ७५ टायरखरेदीच्या निविदेला मान्यता दिली. त्यावर, स्थायीने ठराव मंजूर करून टायरखरेदीचा मार्ग मोकळा केला. परंतु, २० दिवसांपासून स्थायीने सभापतींच्या स्वाक्षरीने मंजूर केलेला ठराव परिवहन विभागाला प्राप्तच झाला नसल्याने टायरखरेदी लांबली. याचा मागोवा घेतला असता त्याठरावावर स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे यांनी स्वाक्षरीच केली नसल्याने ठराव नगरसचिव विभागाकडे आला नसल्याचे समोर आले. टायरअभावी दोन महिन्यांपासून १२ बस उभ्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी बसची संख्या कमी पडू लागली आहे. अपुऱ्या बसमुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी परिवहन विभागाने स्थायीने मंजूर केलेल्या ठरावाच्या मागणीसाठी नगरसचिव विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. (प्रतिनिधी)

तांत्रिक अडचणीमुळे ठरावावर सभापतींनी स्वाक्षरी केलेली नाही. त्यावर, लवकरच स्वाक्षरी होऊन तो ठराव परिवहन विभागाला पाठवला जाईल.
- वासुदेव शिरवळकर, नगर सचिव
त्या ठरावावर स्वाक्षरी केली असून तो सचिव विभागाला पाठवला आहे. - प्रभाकर म्हात्रे,
स्थायी समिती सभापती

Web Title: 12 bus waiting for tires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.