ठाकुर्ली उड्डाणपुलावर बसवले १२ गर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:39+5:302021-03-09T04:43:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपुलाचे कल्याण दिशेकडील काम कुर्मगतीने सुरू असल्याबद्दल नेहमीच ओरड होते. मात्र, सध्या या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपुलाचे कल्याण दिशेकडील काम कुर्मगतीने सुरू असल्याबद्दल नेहमीच ओरड होते. मात्र, सध्या या पुलाच्या कामाला वेग आला आहे. मागील आठवडाभरात या पुलावर १२ गर्डर बसवण्यात आले आहेत. येत्या काळात तेथे मास्केट आणि प्लास्टर करण्यात येणार आहे.
डोंबिवली पूर्व - पश्चिमेस ये - जा करण्यासाठी सध्या ठाकुर्ली उड्डाण पुलाचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. सध्या या पुलाची डोंबिवली दिशेकडील बाजू सुरू आहे. कल्याण दिशेकडील बाजूचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी व दुकानदारांना धूळ, चिखल तसेच सतत कामाच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले कमालीची त्रस्त झाली आहेत.
या पुलाचे काम अर्धवट असल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कामाच्या संथ गतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कामाला गती देत आठवडाभर रात्रीच्या वेळेत पुलावर गर्डर टाकण्यात आले होते. या पुुलाचे आणखी आठ गर्डर मे महिन्याच्या अखेरपर्यंत टाकून तेथे प्लास्टर करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुलाचे पिलर उभारण्यासह अन्य कामात तांत्रिक अडचणी येत असल्याने कामात दिरंगाई होत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गर्डर उभारण्यात येत आहे. त्या पुढे रेल्वेच्या हद्दीतही कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
----------------