बदलापूरमध्ये १२ तास बत्तीगूल; दहावीच्या विद्यार्थ्यांचे झाले हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 11:06 PM2020-03-08T23:06:19+5:302020-03-08T23:06:55+5:30
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका
बदलापूर : बदलापूरच्या पूर्व भागात तब्बल १२ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दहावी आणि बारावीची परीक्षा असताना विजेचा हा गोंधळ झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शनिवारी मध्यरात्री खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी दुपारी सुरळीत झाला.
बदलापूर पूर्व विभागातील कुळगाव, शिरगाव, शिवाजी चौक, गांधी चौक, खरवई, ज्युवेली आदी परिसरातील ४० हजारांहून अधिक ग्राहक आणि एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरात शनिवारी रात्री १ च्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी दुपारी १२ वाजता सुरळीत झाला. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे बदलापूर पूर्व परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
बदलापूर पूर्व येथे शिरगाव, आपटेवाडी नाक्याजवळ असलेल्या शबरी हॉटेल जवळ एका ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकण्यात आली आहे. उच्चदाबाची केबल अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने आतापर्यंत या ठिकाणी अनेक वेळा बिघाड झाला आहे. महावितरणला हा तांत्रिक दोष दुरुस्त करताना १२ तास लागतात, त्यामुळे बदलापूरमधील नागरिक आणि महावितरणचे ग्राहक हे महावितरणच्या कारभाराविषयी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. शबरी हॉटेलजवळ आणि जुन्या पेट्रोल पंपाच्या पुढे अशा दोन ठिकाणी महावितरणने दोन खांबांच्या मध्ये अंडरग्राउंड केबल टाकली आहे. दाब वाढल्यानंतर आणि कमी झाल्यावर अनेक वेळा या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊन लाखो नागरिकांना वेठीस धरले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो.
ग्राहकांची अडवणूक नको
बदलापूर पूर्व परिसरातील कात्रप येथील जुना पेट्रोलपंप आणि आपटेवाडी शिरगाव जवळ शबरी हॉटेल येथे महावितरणने काही ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकल्याने अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या अनेक तक्र ारी आहेत. या दोन्ही ठिकाणी तांत्रिक दोष दूर करून पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या वेळेस असा तांत्रिक दोष निर्माण होईल, त्या वेळेस ओव्हरहेड वायर टाकून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा जोडून द्यावा, अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच अन्य भागात महावितरण संदर्भात तक्र ारी असतील त्यांनी थेट माझ्याशी संपर्कसाधावा, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.