लॉजमधील १२ बेकायदा खोल्या पाडल्या
By admin | Published: May 2, 2017 01:41 AM2017-05-02T01:41:49+5:302017-05-02T01:41:49+5:30
खारीगाव नाका येथील भाजी मार्केटमधील मानसरोवर या इमारतीत बेकायदा व्यवसाय सुरू असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील
भार्इंदर : खारीगाव नाका येथील भाजी मार्केटमधील मानसरोवर या इमारतीत बेकायदा व्यवसाय सुरू असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील १२ बेकायदा खोल्या तब्बल २० वर्षानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी जमीनदोस्त केल्या. रविवारी सुद्धा मानसरोवरील कारवाई सुरुच ठेवण्यात आली होेती.
काही दिवसांपूर्वी राज्य विधीमंडळ महिला हक्क समितीने पालिकेला भेट देत शहरातील तसेच पालिका कार्यालयातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी नगरसेवक प्रेमनाथ पाटील व नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनी भार्इंदर पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात वारांगनांचा वावर असून त्याचा त्रास सामान्यांना होतो. त्याविरोधात अनेक तक्रारी देऊनही पोलीस कारवाई करीत नसल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच वारांगनांमुळे परिसरात बेकायदा लॉजिंग-बोर्डींगची संख्या वाढत असताना पालिकाही कारवाई करीत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी समितीने पालिकेला बेकायदा लॉजिंग-बोर्डींगवर कारवाई करण्यासह विभागीय पोलीस अधिकारी नरसिंग भोसले यांना वारांगनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पालिकेने शनिवारी प्रभाग समिती कार्यालय तीन अंतर्गत असलेल्या खारीगाव नाकाजवळच्या भाजी मार्केट परिसरातील मानसरोवर लॉजवर प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्या नियंत्रणाखाली पथकाने कारवाई केली. या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर दुकाने तर पहिल्या मजल्यावर गोदाम सुरु होते. दुसऱ्या मजल्यावर पाच व तिसऱ्या मजल्यावर सात खोल्यांसह गच्चीवर पत्र्याची शेड बांधून त्यात अनैतिक व्यवसाय सुरु करण्यात येत होता. (प्रतिनिधी)