मानवी आरोग्यास घातक मांगूर माशांची १२ लाख अंडी नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:57 PM2020-12-16T23:57:33+5:302020-12-16T23:57:39+5:30
मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरलेत्या आफ्रिकन मांगूर माशांवर राज्य शासनाने बंदी घातली असून या माशांचे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र नष्ट करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिले आहेत.
पालघर : मानवी आरोग्याला अत्यंत घातक असल्याने राज्यात बंदी घातलेल्या मांगूर माशांची विक्रमगडमधील शेतात छुपी पैदास करणाऱ्या तीन आरोपींवर सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर यांनी धाड घालून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी १२ लाख अंडी नष्ट करण्यात आली.
मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरलेत्या आफ्रिकन मांगूर माशांवर राज्य शासनाने बंदी घातली असून या माशांचे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र नष्ट करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे ५० टनपेक्षा जास्त मांगूर मासे आतापर्यंत नष्ट करण्यात आले असून या माशांचे कुठेही उत्पादन घेतले जाऊ नये याकडे मत्स्यव्यवसाय विभाग, पोलीस लक्ष ठेवून होते.
विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे (शिंपीपाडा) येथील कुलदीप पाटील यांच्या शेतावर बंदी घातलेल्या मांगूर माशांचे प्रजनन व संवर्धन केले जात असल्याची माहिती पालघर-ठाण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी अधिकारी दिनेश पाटील, सुरेंद्र गावडे, विक्रमगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. मोरे, महावीर जगताप यांच्यासह रविवारी शेतावर धाड घातली.
यावेळी १०० किलो मांगूर मासे आणि १० ते १२ लाख मांगूर माशांद्वारे प्रजनन केलेली अंडी असा साठा त्यांना मिळून आला. या प्रकरणी शेताचे मालक कुलदीप पाटील, आजीम खान सईद अख्तर (रा. माहीम-मुंबई आणि गुलाम शेख रा. जोगेश्वरी) यांच्याविरोधात विक्रमगड पोलिसात कारवाई करण्यात आल्याची माहिती पालव यांनी दिली. मांगूर माशाला कुजलेल्या बैल, शेळी, कोंबड्या यांचे मांस अन्न म्हणून दिले जात असल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊन कॅन्सरसारख्या आजाराची लागण होत असल्याने त्यावर शासनाने बंदी घातली आहे. दरम्यान, आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनीत व्यापारी मांगूर माशांचे उत्पादन घेत असल्याचे आढळले आहे.
आम्ही भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव येथील वनविभागाच्या जागेत अनधिकृतरीत्या बनविलेल्या १७ तलावांना नोटिशी बजावल्या असून पोलीस कारवाईचे आदेश दिले आहेत.
- आनंद पालव,
सहायक आयुक्त
या माशांना परप्रांतीयांच्या वस्तीत मोठी मागणी असून त्यांची विक्री करून आर्थिक कमाई करण्याचा डाव उधळला गेला आहे.