१२ स्कूलबसवर आरटीओची कारवाई; मीरा-भाईंदरमध्ये विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:27 PM2019-06-19T23:27:21+5:302019-06-19T23:27:35+5:30
भिवंडीसह ठाण्यातही तपासणी
ठाणे : शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या स्कूलबसची तपासणी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने मीरा-भार्इंदर परिसरात सुरू केली. यामध्ये अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया डझनभर बसवर कारवाई करून त्या ठाण्यातील मर्फी येथील आरटीओ कार्यालयात आणून जप्त केल्या आहेत. अशा प्रकारे कारवाई केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी ठाणे आरटीओने मीरा-भार्इंदर मनपाकडे पत्रकाद्वारेही केली आहे. ही तपासणी मीरा-भार्इंदरपाठोपाठ भिवंडी आणि त्यानंतर ठाण्यात केली जाणार असल्याची माहिती आरटीओने दिली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार स्कूलबसला २३ अटी व शर्थी घातल्या आहेत. त्यानुसार, प्रादेशिक परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या आदेशानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने शाळा सुरू झाली, त्या दिवशी मीरा-भार्इंदरमधील स्कूलबसतपासणी केली. यासाठी आरटीओचे वायुवेग पथक तैनात केले. या पथकाने विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाºया सोमवार-मंगळवार असे दोन दिवस प्रत्येकी सहा बसवर कारवाई केली. कारवाईनंतर पोलीस ठाण्यात त्या गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था नसल्याने अखेर आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या गाड्या तेथून ठाण्यातील मर्फी येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारात आणून जप्त केल्या आहेत.
ठाणे आरटीओने मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन वाहने अडकवून ठेवण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्याबाबत संबंधित महापालिकेने जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिल्याचे ठाणे आरटीओ प्रशासनाने सांगितले.
मीरा-भार्इंदरमध्ये तीन ते चार एकर जागेची गरज
आरटीओच्या पथकामार्फत मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत वाहने अडकवून ठेवली जातात. २०१७-१८ मध्ये आरटीओने १३ कोटी ५५ लाखांची दंडात्मक कारवाई केली. सध्या या कार्यालयाकडे वाहने अडकवून ठेवण्याकरिता स्वत:च्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वाहने ठेवण्यास पर्यायाने शासनाची महसूलवसुली करण्यास मर्यादा येत आहेत. त्याकरिता आपल्या अखत्यारित असलेली महापालिकेच्या मालकीची बंदिस्त स्वरूपाची किमान तीन ते चार एकर मोकळी जागा मिळावी. वाहनांना येजा करण्याकरिता स्वतंत्र प्रवेशद्वार असावे. सुरक्षेकरिता दिवस व रात्रपाळीकरिता सुरक्षारक्षक असावा. अडकवून ठेवलेल्या वाहनांचे सुरक्षेपोटी सुरक्षाशुल्क महापालिकांनी संबंधित वाहनधारकांकडून आकारावे. वाहनमुक्तीच्या लेखी आदेशानुसार वाहन मुक्त करावे. त्यासाठी नोंदवही असावी, अशा आशयाचे पत्र मीरा-भार्इंदरच्या महापालिका आयुक्तांना दिल्याचे आरटीओने सांगितले.
‘मीरा-भार्इंदरमध्ये केलेल्या कारवाईस दुजोरा देऊन या कारवाईतील वाहने अडकवून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही महापालिकेकडे केली आहे. महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
- नंदकिशोर नाईक,
उपप्रादेशिक अधिकारी,
ठाणे आरटीओ