रस्ता सुरक्षा अभियानात ठाण्यातील १२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:49 PM2019-02-04T21:49:31+5:302019-02-04T22:15:57+5:30
वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ४ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान पथनाटय, निबंध अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये ठाण्यातील २५० शाळा आणि ४० महाविद्यालयातील १२ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
ठाणे: वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरुपाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणा-या नागरिकांकडूनही इतरांनी प्रेरणा घ्यावी. साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद सार्थकी लावू शकतो, असे आवाहन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी सोमवारी केले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ४ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन साकेत पोलीस कवायत मैदानावर पांडेय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी हे आवाहन केले. वाहतूकीचे नियम न पाळल्याने अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यु तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना बहुतांश वेळा घडतात. त्यामुळे यंदा केंद्र शासनाने सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीद घेऊन रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याच अनुषंगाने वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा, असे आवाहन करतांनाच विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांची जनजागृती करावी, असेही पांडेय यावेळी म्हणाले. ठाणे, उल्हासनगर आणि डोंबिवली परिसरात वाहतूक कोंडीच्या वेळी काही दक्ष नागरिक उत्स्फूर्तपणे कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरतात. अशा नागरिकांकडूनही इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ठाण्यातील मनोहर वसानी, गिरीश पाटील, डोंबिवलीतील सुप्रिया कुलकर्णी आणि विश्वनाथ बिवलकर अशा १४ वाहतूक स्वयंसेवकांचा सत्कार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आला.
रस्ता सुरक्षा अभियानात निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी ठाण्यातील २५० शाळा आणि ४० महाविद्यालयातील १२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या अभियानामध्ये वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यात विरु ध्द दिशेने प्रवास करणार नाही, मद्य प्राशन करु न वाहन चालविणार नाही, निष्कारण हॉर्न वाजविणार नाही, अतिवेगाने गाडी चालविणार नाही, परवान्यापेक्षा जास्त संख्येने रिक्षामध्ये प्रवास करणार नाही, घातक पध्दतीने ओव्हरटेक करणार नाही आदी अनेक वाहतूकीच्या विषयांचा समावेश राहणार आहे. दरम्यान, यावेळी एनसीसीच्या १५ पथकांनी आणि पोलिसांनी शानदार संचलन केले.
यावेळी वाहतूक नियमाचे धडे देणा-या रोबोटने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. वाहतूक पोलिसांनी उपस्थितांसोबत रस्ता सुरक्षेची शपथ घेतली. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.