ठाण्यातील १२ लसीकरण केंद्रे शुक्रवारीदेखील बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:17+5:302021-04-10T04:39:17+5:30

ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आता लसीचादेखील तुटवडा जाणवू लागला आहे. पाच लाख डोसची मागणी केल्यानंतरही आजही ...

12 vaccination centers in Thane also closed on Friday | ठाण्यातील १२ लसीकरण केंद्रे शुक्रवारीदेखील बंदच

ठाण्यातील १२ लसीकरण केंद्रे शुक्रवारीदेखील बंदच

Next

ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आता लसीचादेखील तुटवडा जाणवू लागला आहे. पाच लाख डोसची मागणी केल्यानंतरही आजही ते उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ठाण्यातील ५६ पैकी १२ लसीकरण केंद्रे शुक्रवारी बंद होती. तर काही केंद्रांच्या ठिकाणी लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांना डोस संपल्याने पुन्हा घरची वाट धरावी लागली किंवा इतर केंद्रांकडे धाव घ्यावी लागल्याचे चित्र दिसत होते. त्यातही आता केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याने त्यानंतर लसीकरण थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. तिला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी यांना लस देण्यास सुरुवात केली. त्यावेळी विविध संस्थांनी त्यांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यानुसार आता ४५ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत नागरिकांना लस मिळावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने ४५ ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. तर खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून ११ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्यानुसार शहरातील ५६ केंद्रांवर लसीकरण केले जात होते, परंतु आता लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने शुक्रवारी केवळ ४४ केंद्रेच सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली, तर इतर केंद्रे मात्र बंद होती. कोपरीत प्रसूतिगृहाच्या खाली सुरू असलेले केंद्र शुक्रवारी बंद होते. त्यामुळे येथे आलेल्यांना लसीकरणासाठी दुसऱ्या केंद्राकडे धाव घ्यावी लागली. तर काहींनी घरी जाण्याचा मार्ग पत्करल्याचे दिसून आले. असेच चित्र इतर केंद्रांवरही दिसत होते. त्यातही ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज यापूर्वी ८ ते ९ हजार जणांचे लसीकरण केले जात होते. परंतु, गुरुवारी केवळ ६ हजार २५१ जणांचे लसीकरण झाले. त्यातही आता उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली.

ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५०० कोविशिल्डचा साठा प्राप्त झाला होता. तर कोव्हॅक्सिनचे ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले होते. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ९२ हजार ८८० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ठाण्यासाठी पाच लाख लसींचा साठा मिळावा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. परंतु, तो साठादेखील उपलब्ध होऊ शकला नसल्याची माहिती महापालिकेने दिली.

Web Title: 12 vaccination centers in Thane also closed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.