ठाणे रुग्णालयातील १२० डॉक्टर संपावर; पालिका आयुक्तांनी घेतली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:34 AM2023-01-03T06:34:53+5:302023-01-03T06:35:14+5:30
संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
ठाणे : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात साेमवारपासून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील १२० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम बाह्यरुग्ण कक्षावर दिसून आला.
मात्र, दिवसभरात एकही शस्त्रक्रिया रद्द केली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दिवसभरात ११ शस्त्रक्रिया झाल्या असून, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात आले.
संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. साेमवारी पाच मोठ्या, तर सहा लघू शस्त्रक्रिया झाल्या. संपाचा परिणाम ओपीडीवर दिसून आला.
पालिका आयुक्तांनी घेतली तातडीची बैठक
संपाची दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आदींची तातडीची बैठक झाली. निवासी डॉक्टरांनी संपातून माघार घेऊन रुग्णांची काळजी घेतल्यास मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिका आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.