संजय गांधी निराधार योजनेचे १२,३९९ लाभार्थी , सर्वाधिक समावेश महिलांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 06:44 AM2017-12-02T06:44:26+5:302017-12-02T06:44:32+5:30
समाजातील वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त, निराधार अशा १३ प्रवर्गांतील नागरिकांना लाभ दिला जातो
ठाणे : समाजातील वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त, निराधार अशा १३ प्रवर्गांतील नागरिकांना लाभ दिला जातो. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात सुमारे १२ हजार ४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या अंबरनाथ तालुक्यात आहे. लाभार्थ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
निराधारांना आधार मिळावा, यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. या योजनेत समाजातील निराधार, विधवा, देवदासी, तृतीयपंथीय, अपंग, अनाथ, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, घटस्फोटित, ज्यांचे पती तुरु ंगात शिक्षा भोगत आहेत, अशा महिला, ३५ वर्षांवरील अविवाहित महिला, दुर्धर आजारी, एचआयव्हीग्रस्त अशा १३ वर्गांना या योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, एका लाभार्थ्याला ६०० रु पये अनुदान देण्यात येते. ही योजना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत असून सध्या तिचे जिल्ह्यात १२ हजार ३९९ लाभार्थी आहेत. यामध्ये सर्वात कमी लाभार्थी मुरबाड तालुक्यात असून सर्वाधिक लाभार्थी अंबरनाथ तालुक्यात आहेत.
शहरी भागात प्रमाण अधिक
या योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक असल्याचे दिसते. यामध्ये उल्हासनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लाभार्थी जास्त आहेत. तर, भिवंडी महापालिकेपेक्षा ग्रामीण भागात लाभार्थी अधिक आहेत. मुरबाड आणि शहापूर या ग्रामीण भागांत अवघे एक हजार ६८६ लाभार्थी आहेत.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा तक्ता
तालुक्याचे नाव लाभार्थी
ठाणे ग्रामीण ६२८
ठाणे मनपा १२५६
कल्याण ग्रामीण ३४३
कल्याण मनपा १३४२
अंबरनाथ ग्रामीण ४७४
अंबरनाथ नपा २३१४
भिवंडी ग्रामीण १४३०
भिवंडी मनपा ८४२
शहापूर १०४७
मुरबाड ६३९
उल्हासनगर २०८४
एकूण १२३९९