१२७० झाडांची कत्तल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:03 AM2018-07-23T03:03:41+5:302018-07-23T03:04:11+5:30
वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी : वनमहोत्सवानंतर महिन्याभरात संक्रांत
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा असतानाही शनिवारच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत तब्बल १२७० झाडे तोडण्याच्या ठरावांना नगरसेवकांनी मंजुरी दिली. एकीकडे वन आणि हरित महोत्सव साजरा करायचा आणि दुसरीकडे झाडे तोडायला मंजुरी द्यायची असा दुटप्पीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
मीरा- भार्इंदरच्या वृक्षप्राधिकरण समितीमध्ये कुणीच तज्ज्ञ सदस्य नसतानाही समिती कार्यरत असून मनमानीपणे झाडे तोडण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेतही शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा पांडे यांनी वृक्षप्राधिकरण समितीमध्ये तज्ज्ञ सदस्य नसल्याने समिती बेकायदा असून ती रद्द करणे तसेच या बेकायदा समितीच्या नैनीताल दौऱ्याचा खर्च संबंधित अधिकाºयांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव आणला होता. परंतु सत्ताधारी भाजपाने तो बहुमताने फेटाळला. तर आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही वेळ मारून नेणारे उत्तर दिले.
शनिवारी आयक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत १२७० झाडे तोडण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. भार्इंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा स्मशानभूमीपर्यंतच्या रस्तारूंदी करणासाठी तब्बल ११८६ झाडे तोडण्याची परवानगी दिली
आहे.
रस्त्याच्या डाव्या बाजूस एकूण ५१५ झाडे असून त्यातील ४०२ झाडे मूळासहित काढणार तर ११३ झाडांचे पुर्नरोपण केले जाणार आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूची ६७१ झाडांपैकी ३९८ झाडे मूळासकट काढणार असून त्यातील २७३ झाडांचे पुर्नरोपण केले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने यापूर्वीही पर्यावरणाचा ºहास केल्याचे उघड झाले आहे.
वृक्षप्राधिकरण नव्हे ही तर वृक्षतोड समिती
विविध विकासकामांच्या आड ठरणारी ३० झाडे तोडण्यास तर धोकादायक या नावाखाली ५४ झाडे तोडण्यास समितीने मंजुरी दिली. बेकायदा चालणाºया समितीने केवळ झाडे तोडण्यास मंजुरी देण्याचा सपाटा लावलेला असून वृक्ष प्राधिकरण समिती की वृक्षतोड समिती, असा प्रश्न सजग नागरिकांना पडला आहे.