अपंग कल्याणाचे १२८ कोटी पडून, ठाण्यात १८ वर्षांत रक्कम खर्च न केल्याचा आ. बच्चू कडू यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:25 AM2017-12-03T02:25:20+5:302017-12-03T02:25:37+5:30

अपंगांसाठी असलेला १२८ कोटींचा अनुशेष १८ वर्षांत खर्च झाला नसून काही रक्कम अपंग कर्मचा-यांच्या योजनांसाठी तर काही जिम आणि इतर कामांसाठी खर्च केल्याचा भंडाफोड आमदार बच्चू कडू यांनी केला.

128 crore of disabled welfare; The charge of Bachu Kadu | अपंग कल्याणाचे १२८ कोटी पडून, ठाण्यात १८ वर्षांत रक्कम खर्च न केल्याचा आ. बच्चू कडू यांचा आरोप

अपंग कल्याणाचे १२८ कोटी पडून, ठाण्यात १८ वर्षांत रक्कम खर्च न केल्याचा आ. बच्चू कडू यांचा आरोप

Next

ठाणे : अपंगांसाठी असलेला १२८ कोटींचा अनुशेष १८ वर्षांत खर्च झाला नसून काही रक्कम अपंग कर्मचा-यांच्या योजनांसाठी तर काही जिम आणि इतर कामांसाठी खर्च केल्याचा भंडाफोड आमदार बच्चू कडू यांनी केला. यासंदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर येत्या तीन महिन्यांत यातील किमान ३० ते ३५ कोटींचा अनुशेष खर्च करावा, अन्यथा प्रहार स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दिव्यांगांच्या समस्यांसंदर्भात शनिवारी कडू यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या वेळी आयुक्त आणि त्यांच्यात साधारणपणे तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून अपंगांच्या अनुशेषाबाबत हा भंडाफोड केला. दरम्यान, या चर्चेअंती अपंगांसाठी १५०० गाळे तसेच शॉपिंग मॉल आणि घरोघरी जाऊन अपंगांचा सर्व्हे करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याची माहिती त्यांनी दिली. या विविध मुद्यांवरून जागतिक अपंग दिनानिमित्त उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, पालिका आयुक्तांकडून सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्याने तीन महिन्यांसाठी आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आमदार बच्चू कडू हे पालिका आयुक्तांची पालिका मुख्यालयात भेट घेणार असल्याने पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. एक तास झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी अनेक मुद्दे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदनदेखील दिले असून त्यामध्ये अपंगांच्या योजनांबाबत अनेक गंभीर बाबी उघड केल्या आहेत. १९९३ साली अपंग कायदा होऊनही ठाणे महापालिकेने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तीन टक्के निधी खर्च न झाल्याने १२८ कोटींचे अपंगांचे नुकसान झाले असल्याचे या निवेदनामध्ये म्हटले आहे.

अवघी पाच टक्के रक्कम वापरल्याची माहिती
- १९९३ साली अपंग कायदा होऊनही ठाणे पालिकेने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तीन टक्के निधी खर्च न झाल्याने अपंगांचे १२८ कोटींचे नुकसान झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. १९९३ पासून २८ कोटींपैकी केवळ ५ टक्के रक्कम खर्च केली असून जिम, लिफ्ट आणि इतर कामांसाठी हा निधी खर्च केल्याचे कडू यांनी सांगितले. २०१३ ते २०१७ या काळातील अनुशेषाची सरासरी ३०० टक्के, तर खर्चाचा अनुशेष ८२ टक्के आहे. २५ हजार अपंगांपैकी केवळ १४३ अपंगांना गाळेवाटप केले असून ७० टक्के गाळे बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
- स्टॉलसाठी १००२ अर्ज आले होते. तेदेखील बाद केले आहेत. अशा सर्व मुद्यांवर पालिका आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली. तीन महिन्यांत १२८ कोटींचा अनुशेष खर्च करण्याबरोबरच अपंगांना १५०० गाळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच खास अपंगांसाठी शॉपिंग प्लाझा तयार करण्यात येणार असून यामध्ये वर अपंगांची राहण्याची सोय, तर खाली गाळे देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, घरोघरी जाऊन अपंगांचा सर्व्हेदेखील केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सर्व गोष्टींसाठी तीन महिन्यांची डेडलाइन दिली असून त्यानंतर मात्र मीटिंग होणार नसून प्रहार स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: 128 crore of disabled welfare; The charge of Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.