भिवंडीतील काटई गावात इमारतीच्या पार्किंग मधील १३ दुचाकी जाळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:10 PM2018-08-04T22:10:52+5:302018-08-04T22:20:24+5:30
भिवंडी : तालुक्यात काटई गावच्या हद्दीतील तळवलीनाका येथे इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या १३ दुचाकींना शनिवारी पहाटेच्या वेळी आग लागली.
काटई ग्रामपंचायत हद्दीत तळवली नाका येथील ओमसाई अपार्टमेंटमध्ये राहणा-या सुजय हिरालाल तिवारी यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून शनिवारी पहाटे धूर येऊन त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावले तेंव्हा त्यांना इमारतीखाली काही जळत असल्याचे जाणवले. त्यांनी इमारतीतील शेजाऱ्यांना व इतर कुटुंबियांना उठवून खाली नेले. तेथे त्यांनी पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या सर्व दुचाकी आगीत जळत असल्याचे पाहिले. सर्वांनी मिळून तात्काळ अग्निशामक दला व पोलीसांना या घटनेची माहिती दिली. मनपाच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन ही आग विझवली.या आगीत सहा दुचाकी पूर्णपणे जाळून खाक झाल्या असून सात दुचाकींना आगीची धग लागून जळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे .
या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात सुजय हिरालाल तिवारी यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रआर दिली आहे.ओम साई अपार्टमेंट या इमारतीचे जमीन मालक खान शमीम मेहमूद व विकासक विजय गोराडकर यांनी या इमारतीच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत व्यावसायीक गाळे बनविण्याचा प्रयत्न केला होता.त्यास इमारतीमधील रहिवाश्यांनी विरोध करीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला .त्यानंतर गेले वर्षभर वारंवार पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या दुचाकी वाहनांचे सीट फाडणे , टायर कापणे , हॅण्डल लॉक मध्ये फेविक्विक टाकणे असे प्रकार होऊ लागले. परंतु त्याकडे रहिवाश्यांनी दुर्लक्ष केले. मात्र शनिवारी दुचाकीनांच आग लावल्याची घटना घडल्यानंतर येथील रहिवाश्यांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.