डबघाईस आलेल्या ठामपाची तीन पादचारी पुलांवर १३ कोटींची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:58+5:302021-03-13T05:12:58+5:30
ठाणे महापालिकेने यापूर्वी देखील घोडबंदरला विद्यापीठ, आर मॉल तसेच विवियाना मॉल, आनंदनगर टोलनाका आदींसह इतर ठिकाणी देखील पादचारी ...
ठाणे महापालिकेने यापूर्वी देखील घोडबंदरला विद्यापीठ, आर मॉल तसेच विवियाना मॉल, आनंदनगर टोलनाका आदींसह इतर ठिकाणी देखील पादचारी पूल उभारले आहेत. परंतु त्यांचा वापर अगदी नगण्य होत आहे. केवळ येथे असलेल्या मॉलसाठीच ते उभारल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. त्यात आता कॅडबरी जवळील सिंघानिया शाळेजवळ देखील ३.७४ कोटींचा खर्च करून पादचारी पूल उभारण्यात येत आहे. याचे भूमिपूजन नुकतेच महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले आहे. तर घोडबंदरच्या कारमेल (मानपाडा) आणि पंचामृत या भागातही सुमारे नऊ कोटी खर्चून दोन पादचारी पूल उभारण्याचा घाट घातला जात आहे. आधीच्याच पुलांवर केलेला खर्च हा वाया गेलेला आहे. त्याचा वापर होताना दिसत नाही. त्यातही घोडबंदर भागातील सध्याचे पादचारी पूल हलविण्याचे प्रयोजन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूल काढून दुसरीकडे पुन्हा बसविता येतात, असा दावा यापूर्वी प्रशासनाने केला आहे. त्यामुळे तेच काढून नव्याने प्रयोजन करण्यात येत असलेल्या पादचारी पुलांच्या ठिकाणी बसवावेत, जेणे करून पालिकेच्या खर्चात देखील बचत होईल, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. एकीकडे कोरोनामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही उधळपट्टी बंद करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
.......
प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधारी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या माध्यमातून फंड गोळा करीत आहे. (मनोहर डुंबरे - गटनेते - भाजप, ठामपा)