सुरेश पुजारीसह १३ जणांना लावला मोक्का
By Admin | Published: January 25, 2016 01:19 AM2016-01-25T01:19:31+5:302016-01-25T01:19:31+5:30
केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. कुविख्यात खंडणीखोर सुरेश पुजारी याच्यासह १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली
उल्हासनगर : केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. कुविख्यात खंडणीखोर सुरेश पुजारी याच्यासह १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली असून पुजारी याच्यावर रेडकॉर्नर नोटीस जारी करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नागरिकांनी फोनवर आलेल्या धमकीला न घाबरता बिनधास्त तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उल्हासनगरातील नामांकित केबलचालक सच्चानंद कारिरा यांची ११ सप्टेंबर २०१५ रोजी ४ वाजण्याच्या दरम्यान कार्यालयात बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरेश पुजारी याच्यासह संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्यावर काही दिवसांतच सीसीटीव्हीत कैद झालेला शार्पशूटर नितीन अवघडे याला सांगली येथून अटक केली. पोलिसांनी पुजारीच्या एकूण १२ जणांना अटक केली आहे. १२ पैकी ६ दलाल व ६ जण शार्पशूटर असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल व २० जिवंत राउंड जप्त केल्याची माहिती जाधव यांनी दिली.
सुरेश पुजारी याने अनेक व्यापाऱ्यांना फोन करून खंडणी मागून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याप्रकाराने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादीचे युवा नेता ओमी कलानी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्तांची भेट घेतली होती. व्यापाऱ्यांनी न घाबरता थेट तक्रार करण्याचे आवाहन त्यावेळी जाधव यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह त्यांचे तपासी सहकारी अधिकारी व परिमंडळातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.