CoronaVirus News: ‘त्या’ आरोपीच्या संपर्कातील १३ पोलिसांचे अलगीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:12 AM2020-06-14T03:12:32+5:302020-06-14T03:12:52+5:30
पालघर पोलीस ठाण्यात एकच खळबळ
पालघर : पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उमरोळी येथील ४४ वर्षीय आरोपीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पालघर पोलीस ठाण्यातील १३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
पालघर तालुक्यातील उमरोळी येथील एका इसमाचे आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडण होत असे. सततच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पतीला पोलिसांनी अटक करीत त्याला पालघर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्यात कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्याच्या घशातील नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. शुक्रवारी पालघर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून यामुळे पालघर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या संपर्कात कोण कोण आले आहे याची माहिती घेण्यात आल्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकासह १३ कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. आरोपी रुग्णाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.