१३ वर्षांच्या देवश्रीने २२ मिनिटे लावून ठेवली नाकाला जीभ; लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदला विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:04 AM2023-01-10T07:04:33+5:302023-01-10T07:05:38+5:30
गिनीजमध्ये नोंदीकरिता प्रयत्न सुरू
- अजित मांडके
ठाणे : तुमची जीभ नाकाला लागते का हो भाऊ?, बर जीभ नाकाला लावण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आणि प्रयत्न केला असेल तर त्याचाही वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो, याची माहिती आहे का तुम्हाला ? एक १३ वर्षांची मुलगी देवश्री अमर ठोकळ हिने तब्बल २२ मिनिटे जीभ नाकाला लावून ठेवण्याचा एक आगळा-वेगळा विक्रम प्रस्थापित केला. लंडन बुक ऑफ रेकॉर्डसह, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचा हा विक्रम नोंदला गेला. देवश्री सध्या बंगळुरू येथे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे.
मुलुंड येथे वास्तव्यास असलेले अमर ठोकळ यांची ती कन्या आहे. गेल्यावर्षी २५ डिसेंबर २०२१ रोजी एका मॉलमध्ये फिरत असताना त्याठिकाणी एक पुस्तक चाळत असताना एका व्यक्तीने ८ मिनिटे जीभ नाकाला लावून गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद केल्याचे ठोकळ यांच्या वाचनात आले. त्यांची मुलगी देवश्री लहानपणापासून नाकाला जीभ लावत असल्याचे ते पाहत होते. अमर यांनी देवश्रीला एकदा विचारले की, तू बराच काळ नाकाला जीभ लावून बसू शकते का? देवश्रीने तत्काळ होकार दिला. आठ महिन्यांपूर्वी तिने वडिलांना सांगितले की, बाबा मी नाकाला जीभ लावून २१ मिनिटे तशीच राहू शकते. मुलीचे हे म्हणणे ऐकून तेदेखील थक्क झाले.
वडिलांनी एका कॅमेरामनच्या मदतीने मुलीचा व्हिडीओ शूट केला. देवश्रीने २२ मिनिटे जीभ नाकाला लावल्याची त्यात नोंद झाली. त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला याची माहिती दिली. तेथे विक्रमाची नोंद घेतली गेली. पुढे युनिक बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्येही देवश्रीच्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंत पाच विक्रमांची नोंद तिच्या नावावर झाली आहे. गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, वयामुळे तिला याठिकाणी नाकारण्यात आले. गिनीजमध्ये सध्या ५० मिनिटे एका व्यक्तीने जीभ नाकाला लावण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. तो विक्रम मोडण्याची देवश्रीची तयारी सुरू आहे.