निवडणूक रिंगणात १३० गुन्हेगार
By admin | Published: February 17, 2017 02:10 AM2017-02-17T02:10:35+5:302017-02-17T02:10:35+5:30
ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांची निवडणूक लढवणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये अनेक उमेदवारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा,
ठाणे : ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांची निवडणूक लढवणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये अनेक उमेदवारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांसह छोट्यामोठ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ठाणे महापालिकेच्या रिंगणात ८१, तर उल्हासनगर महापालिकेच्या आखाड्यात ४९ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
ठाण्यात गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या शिवसेना आणि मनसेमध्ये समसमान असून या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी २०-२० गुन्हेगार रिंगणात उतरवले आहेत. पार्टी विथ डिफरन्सचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाने १४ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिले आहेत. काँग्रेसच्या वळचणीला केवळ ४ गुन्हे दाखल असलेले उमेदवार गेले आहेत. सर्वाधिकम्हणजे २३ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिले असून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आपल्यावरील शिक्का मजबूत केला आहे. या सर्व प्रमुख पक्षांचे मिळून तब्बल ८१ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुसंख्य उमेदवारांमध्ये शिक्षणाचा अभाव असून त्यांच्यावर गुन्हे असल्याने ठाणेकरांचे महापालिकेतील प्रतिनिधित्व करण्यास ते सरसावले आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांमध्ये बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील चार विद्यमान नगरसेवक निवडणुकीमध्ये पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. यामधील सुधाकर चव्हाण यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणे, दरोडा, फसवणूक, भ्रष्टाचार, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, यासारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या दोघांवरदेखील फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, घोटाळे असे आरोप आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रांत चव्हाण यांच्यावर मारामारी, धमकी देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, असे गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे उमेदवार मुकेश मोकाशी यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेचे उमेदवार गणेश कांबळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, गुन्हेगारी कारवाया आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर भाजपाचे पुरुषोत्तम पाटील, नारायण पवार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर, शिवसेनेच्या माणिक पाटील, सचिन म्हात्रे, संजय भोईर, मधुकर पावशे, लॉरेन्स डिसुझा यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीमध्ये नजीब मुल्ला, रामाशीश यादव यांच्यावर, तर मनसेच्या गंगाधर माळी यांच्यावरदेखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या २० उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या १३ आहे. तर, मनसेनेदेखील २० वादग्रस्त उमेदवार दिले असून गंभीर गुन्हे असलेल्यांचे प्रमाण १७ आहे. भाजपाच्या १४ उमेदवारांपैकी १२ गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीच्या २३ पैकी १२ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, काँग्रेसच्या चारही उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)