कच्छ युवक संघाच्या १३ हजार रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:09+5:302021-04-29T04:32:09+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविडकाळात जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी कच्छ युवक संघाने मुंबई, डोंबिवली ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोविडकाळात जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी कच्छ युवक संघाने मुंबई, डोंबिवली आदी ठिकाणी वर्षभरात भरवलेल्या रक्तदान शिबिरात आतापर्यंत तेरा हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. संघाच्या अँकरवला रक्तदाता अभियानांतर्गत ही शिबिरे घेण्यात आली.
कच्छ युवक संघातर्फे वर्षांनुवर्षे रक्तदानाची चळवळ सुरू आहे. मागील १५ वर्षांत संघाने सुमारे पावणेदोन लाख रक्तदाते तयार केले आहेत. अनकेदा सरकारी रक्तपेढ्या तसेच स्थानिक पातळीवरील रक्तपेढ्यांनाही त्यांनी सहकार्य करत रक्तदाते तयार केले आहेत. आता त्यांची स्वतंत्र रक्तदाते सूची तयार आहे. समाजबांधवांना जेथे रक्ताची गरज भेडसावते तेथे अल्पावधीत रक्तदाते उभे करण्याचा त्यांचा मानस असतो. आतापर्यंत हजारो नागरिकांना त्यांनी रक्त उपलब्ध करून दिले आहे.
कोविडकाळातही रक्त तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी संघाने समाजमाध्यमांवर ग्रुप तयार केला आहे. रक्ताची कोणाला गरज भासल्यास शहर, परिसरनिहाय यादीतील दात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले जाते. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रचनात्मक कार्य उभे केल्याचे अँकरवला अभियानाचे डोंबिवली येथील पदाधिकारी जयेश मारू यांनी सांगितले. ते म्हणाले की, या अभियानाची सुरुवात संकल्पनेचे मूळ संस्थापक कोमल छेडा, धीरज छेडा, भरत गोगरी, चेतन छेडा आहेत. या मंडळींनी या कार्यात खूप सातत्य ठेवले. संघाचा आता पालघर, वसई, दादर, डोंबिवली, अंबरनाथ आदीपर्यंत विस्तार झाला असून, रक्तदात्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
संघातील मंडळींनी वर्षभरात सुमारे ५०० कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान केला आहे. समाजमाध्यमांवरील ग्रुपच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे. त्याद्वारे त्यांनी जिथे गरज लागेल तिथे नागरिकांना पाठवून मदत केली आहे. बहुतांशी शासकीय रक्तपेढ्या या संघटनेच्या शिबिरासाठी आग्रही असतात.
------------
डोंबिवलीत ठिकठिकाणी शिबिरे
कच्छ युवक संघाचे मुख्य केंद्र डोंबिवलीत असून, त्याद्वारे वर्षभरात पूर्वेतील भोपर, लोढा परिसर तसेच पश्चिमेतील विविध ठिकाणी आतापर्यंत रक्तदान शिबिरे भरवली आहेत. त्याद्वारे समाजाचे संघटन करून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा सामाजिक बांधिलकीचा संदेश ते कृतीतून देत आहेत.
-----------