ठाण्यात एमपीएससीचे १३०८० परीक्षार्थी; रविवारी ३८ केंद्रांवर परीक्षा
By सुरेश लोखंडे | Published: April 29, 2023 06:14 PM2023-04-29T18:14:53+5:302023-04-29T18:15:01+5:30
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब व क (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ रविवार घेण्यात येत आहे.
ठाणे : महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब व क (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ रविवार घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ३८ उप परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे. एमपीएससीच्या या परीक्षा केंद्रांवर १३ हजार ८० विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यानच्या पहिल्या सत्रात घेतली जात आहे. या परिक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.
बेकायदेशीर जमाव जमवुन गैर प्रकार करण्यास मनाई करण्यात आली आहे.या एकूण ३८ उपकेंद्रावर परिक्षा चालु असतांना सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यात आला आहे. झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्यासह मोबाईल फोन वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहे. हा आदेश सकाळी ७ वाजेपासून दुपारी २ वाजे पर्यंत अंमलात राहील, असे ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी सांगितले आहे.