भिवंडी पालिका क्षेत्रात १३११ इमारती धोकादायक; शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला
By नितीन पंडित | Published: June 10, 2024 04:39 PM2024-06-10T16:39:02+5:302024-06-10T16:39:43+5:30
अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.
भिवंडी: शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शहरात १३११ इमारती धोकादायक व अति धोकादायक असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.यात सुमारे ३ हजार कुटुंबातील १५ हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.
भिवंडीतील इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आता पर्यंत ९० हुन अधिक बळी गेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व अती धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश असताना लोकसभा निवडणूक कामात अनेक पालिका कर्मचारी दोन महिने व्यस्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले होते.भिवंडी पालिका क्षेत्रातील पाच प्रभाग समिती अंतर्गत १३११ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. ज्यामध्ये २८७ इमारती अती धोकादायक आहेत.यामध्ये इमारतींसह कौलारू घरे,यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे.
प्रभाग समिती क्रमांक एक अंर्तगत १२५ धोकादायक इमारती आहेत ज्यामध्ये अती धोकादायक सी १ श्रेणीतील इमारतींची संख्या ३२ आहे.तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करण्याच्या सी २ ए श्रेणीत १७,इमारती मध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी २ बी श्रेणीत ६६ तर किरकोळ डागडुजी करण्यालायक सी ३ श्रेणीत १० इमारतींचा समावेश आहे .प्रभाग समिती क्रमांक दोन अंर्तगत ३१० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत .ज्यामध्ये सी १ च्या श्रेणीत ४१ इमारती,सी २ ए श्रेणीत १९५,सी २ बी श्रेणीत ७० तर सी ३ श्रेणीत ४ इमारतींचा समावेश आहे.
प्रभाग समिती क्रमांक तीन अंर्तगत २३४ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.या मध्ये सी १ श्रेणीत ६०,सी २ ए श्रेणीत ४२,सी २ बी श्रेणीत ९९ तर सी ३ श्रेणीत ३३ इमारतींचा समावेश आहे.प्रभाग समिती क्रमांक चार अंर्तगत २८४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.सी १ श्रेणीत ८४ इमारती,सी २ ए श्रेणीत १९९,सी २ बी प्रणित ८९ तर सी ३ श्रेणीत १ इमारतींचा समावेश आहे.तर प्रभाग समिती क्रमांक पांच अंर्तगत सर्वाधिक ३५८ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.यामध्ये सी १ श्रेणीत ८० इमारती असून सी २ ए श्रेणीत ११८,सी २ बी श्रेणीत १५८ व सी ३ श्रेणीत २ इमारतींचा समावेश आहे.
अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.यातील अनेक इमारती अनधिकृत पद्धतीने उभ्या राहिल्या असतानाच जमीन मालक व पगडी पद्धतीने फ्लॅट्स घेतलेले कुटुंबीय यांच्या वादात असंख्य इमारती निर्मनुष्य करण्यात अडचणी येत आहेत.धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज असून संभाव्य दुर्घटना होण्याच्या भीतीने अनेक धोकादायक इमारती खाली करण्यासाठी संबंधित कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तर अनेक धोकादायक इमारती निर्मनुष्य करण्यात आल्या असून अशा इमारतींचा वापर होऊ नये यासाठी तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.तर धोकादायक व अती धोकादायक इमारतींच्या दर्शनी भागावर सदर इमारत धोकादायक असल्या बाबतचे बोर्ड लावण्यात आले आहेत अशी माहिती पालिका प्रशासना कडून देण्यात आली आहे.