१,३१३ कुटुंबांचे पाणी थकबाकीमुळे खंडित, ठामपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 12:29 AM2020-12-23T00:29:36+5:302020-12-23T00:30:02+5:30
Thane : २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणीदेयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे.
ठाणे : मालमत्ता कर आणि पाणी कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून पाणीबिलाची देयके न भरणाऱ्यांवर धडक कारवाई करून १,३१३ नळजोडण्या खंडित केल्या आहेत.
२०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणीदेयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे.
याअंतर्गत नळ संयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंपरूम सील करणे, पंप जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेंतर्गत २१ डिसेंबर रोजी १०७ नळ जोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद केला असून २२ डिसेंबरपर्यंत एकूण १,३१३ नळ जोडण्या खंडित केल्या आहेत.
तरी नागरिकांनी त्यांची पाणीबिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करून होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. कोरोनामुळे महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, त्यामुळे महसूल वसुलीचा विषय पालिकेने प्राधान्याने हाती घेतला आहे.