ठाणे जिल्ह्यातील १३,२०८ यंत्रे स्ट्राँगरूममध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 01:59 PM2024-05-21T13:59:45+5:302024-05-21T14:05:17+5:30
जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या.
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभेच्या २४ उमेदवारांसह, कल्याणच्या २८ आणि भिवंडीच्या २७ उमेदवारांसाठी जिल्हाभरात साेमवारी मतदान झाले. जिल्हाभरातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या.
या मतदान यंत्रांना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरद्वारे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आले आहे. जमा झालेल्या ठिकाणीच ४ जून राेजी या यंत्रांमधील मतमाेजणी करण्यात येईल. या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी, सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून तीन टप्प्यांत हाेणार आहे.
+
ठाणे लाेकसभा मतदारसंघातील चार हजार ९०६ मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचे मत बंदिस्त केले. या यंत्रांना सात ट्रक, ११ टेम्पाे आणि १६ कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे. सर्व यंत्रणा दाेन हजार ४५३ मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू हाेरायझन हायस्कूल, कासारवडवली, घाेडबंदर राेड येथे जमा करण्यात आली आहेत. या हायस्कूलमध्ये मतमाेजणी करण्यात येणार आहे.
ट्रक, टेम्पोतून यंत्रे केली जमा
कल्याण लाेकसभेच्या एक हजार ९६० मतदान केंद्रांवरील तीन हजार ९२० मतदान यंत्रे डाेंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर, नाट्यगृहाच्या तळमजल्यात कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत. या यंत्रांना दहा ट्रक, सहा टेम्पाे आणि सात कंटेनरद्वारे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आले. या यंत्रातील मतमाेजणी डाेंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील दिवंगत सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे.
भिवंडी लाेकसभेच्या दाेन हजार १९१ मतदान केंद्रांवरील चार हजार ३८२ मतदान यंत्रांना सावद गाव येथील केयूडी बिझनेस क्लस्टर येथे २० ट्रक, दाेन टेम्पाे आणि आठ कंटेनरद्वारे आणण्यात आले आहे. येथेच मतमाेजणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.