कळव्यात १३४ तर उथळसरमध्ये १०६ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:06 AM2018-04-19T02:06:02+5:302018-04-19T02:06:02+5:30
धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू : मे अखेरीस घरे सोडा, अन्यथा सक्तीने बाहेर काढण्याचा दिला इशारा
ठाणे : पावसाळा दीड महिन्यावर आल्याने ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला असून कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत १३४, तर उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या १०६ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कळव्यात दोन अतिधोकादायक इमारती असून उथळसरमध्ये चार अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत नागरिकांनी स्वत:हून इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने लोकांना घराबाहेर काढावे लागेल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
ठाणे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना लागू करणे गरजेचे आहे. तसा तत्त्वत: निर्णय घेतला असला, तरी क्लस्टरच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दीड महिन्यानंतर पावसाला सुरु वात होताच शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाच्या वतीने संपूर्ण शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे.
शासनाच्या वतीने धोकादायक इमारतींबाबत जे धोरण ठरवून दिले आहे, त्या धोरणानुसारच यावर्षी सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये सी-१ श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ ए मध्ये इमारत रिकामी न करता दुरुस्त करण्याजोग्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ बी श्रेणीमध्येसुद्धा इमारत रिकामी न करता दुरु स्त करणे शक्य असलेल्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. तर, सी-३ या श्रेणीमध्ये ज्या इमारतींची किरकोळ दुरु स्ती करायची आहे, अशा इमारतींचा समावेश आहे.
ठाण्यातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण
कळवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या चार होती, तर उथळसरमध्ये हीच संख्या सात होती. अतिक्र मण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये कळव्यातील अतिधोकादायक इमारतींची संख्या दोनने तर उथळसरमध्ये ही संख्या तीनने कमी झाली आहे.
प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू
आता सर्व इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली आहे. मे पर्यंत संपूर्ण प्रभाग समितीनिहाय इमारतींची माहिती आल्यानंतर नागरिकांनी इमारती दुरु स्त न केल्यास किंवा इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने या इमारती रिकाम्या केल्या जातील, असे अतिक्र मण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.