अट्टल सोनसाखळी चोरणाऱ्या दुकलीकडून १४ गुन्हे उघडकीस ; त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू
By अजित मांडके | Published: June 26, 2023 03:34 PM2023-06-26T15:34:06+5:302023-06-26T15:34:18+5:30
त्या गुन्ह्यातील २६० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात यश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडीत धूम स्टाईलने मोटारसायकल वरून सोनसाखळी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल सोनसाखळी चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी तब्बल १४ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातील १३ लाख रुपयांचे एकूण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केले आहे. तर त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हेगार वॉच करण्यासह आणि हायवे रॉबरी चोरीस प्रतिबंध करण्यासाठी भिवंडी परिमंडळ-२ परिसरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पेट्रोलींग सुरू असताना, साईबाबा मंदिरासमोरील रोडवर कल्याण बाजुकडुन भिवंडी बाजुकडे जाणाऱ्या रोडवरून काळया रंगाच्या मोटार सायकलवरून संशयास्पदरित्या भरधाव वेगात आलेल्या भिवंडी, शांतीनगर रोड येथील मोहझम नवाज शरीफ अन्सारी (२८) आणि नियाज अहमद हुसेन शेख (३२) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदारांसह भिवंडी शहरात केलेल्या गुन्हयांची कबुली दिली. भिवंडी परिमंडळ-२ मधील १२ गुन्हयांसह भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्हे असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आले. तसेच त्यांच्याकडून एकुण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व इतर ऐवज जप्त केला असून त्याची एकूण किंमत १३ लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या त्या दोघांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कामगिरी भिवंडी गुन्हे शाखा घटक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे, प्रफुल्ल जाधव, धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, निसार तडवी, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव, रविंद्र पाटील, राजेश शिंदे, पोलीस हवालदार गंगेश शिर्के, साबीर शेख रंगनाथ पाटील, सुनिल साळुखे, शशिकांत यादव, प्रकाश पाटील, देवानंद पाटील, किशोर थोरात, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई सचिन सोनवणे, अमोल इंगळे, जालींदर साळुंखे, रोशन जाधव, प्रशांत बर्वे, भावेश घरत आणि माया डोंगरे, श्रेया खताळ यांनी केलेली आहे.