बापगाव देवरुंग येथील १४ जर्सी गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:12+5:302021-09-05T04:46:12+5:30
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील बापगाव देवरुंग ग्रामपंचायत हद्दीतील पशुपालक हरिश्चंद्र केणे यांच्या गोठ्यातील २२ जर्सी गायींपैकी ११ गायींसह तीन ...
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील बापगाव देवरुंग ग्रामपंचायत हद्दीतील पशुपालक हरिश्चंद्र केणे यांच्या गोठ्यातील २२ जर्सी गायींपैकी ११ गायींसह तीन वासरांना जीव गमवावा लागला आहे. तर बाकी आठ जर्सी गायींनाही संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त विजय धुमाळ, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले. मृत गायींचे शवविच्छेदन करून त्याचा अहवाल पुण्यात पाठवला आहे.
अहवाल आल्यानंतरच हा काेणता आजार आहे याचे निदान हाेणार असल्याचे धुमाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे यांनी घटनेची पाहणी केली. केणे यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. उपसरपंच बाळाराम गोडे यांनी देवरुंग व बापगावात जनावरांना ग्रामपंचायतमार्फत मोफत लसीकरण केले जाईल व हरिश्चंद्र केणे यांना ग्रामपंचायतच्या वतीने सहकार्य करण्याचे जाहीर केले.