१४ लाख पानांचे झाले डिजिटायझेशन; दुर्मीळ ग्रंथांसह पुस्तकांचे होणार जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:24 AM2018-08-02T04:24:55+5:302018-08-02T04:25:02+5:30
मराठी ग्रंथसंग्रहालयाने सुरू केलेल्या डिजिटायझेशन योजनेत आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन झाले आहे. लवकरच पुढील सहा लाख पानांचे डिजिटायझेशन करून या नावीन्यपूर्ण योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालयाने सुरू केलेल्या डिजिटायझेशन योजनेत आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन झाले आहे. लवकरच पुढील सहा लाख पानांचे डिजिटायझेशन करून या नावीन्यपूर्ण योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालयाने १२५ वर्षे पूर्ण केली आहे. या ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांमध्ये दीड लाख पुस्तके असून बाइंडिंग केलेली साडेतीन हजार मासिके, ९० हस्तलिखिते, तर ग्रंथालयाच्या स्थापनेपासून पुढील ५० वर्षांतील ४० हजार पुस्तके आहेत. या दुर्मीळ ग्रंथांचे, जीर्ण पुस्तकांचे जतन व्हावे, या जीर्ण झालेल्या पुस्तकांची पृष्ठे हाताळणे अशक्य असल्याने वाचकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि ही पुस्तके जगभरात वाचली जावी, यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने डिजिटायझेशन ही नावीन्यपूर्ण योजना अमलात आणली. या पुस्तकांचे डिजिटायझेशन करून ती संगणकावर उपलब्ध झाली, तर त्याचा वाचक, अभ्यासकांना फायदा होईल, त्यांना सहजपणे त्यांचा वापर करता येईल. वाळवी लागणे, पाने फाटणे यासारख्या समस्याही दूर होतील, यासाठी ही योजना आणल्याचे संग्रहालयाचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी सांगितले.
छापील स्वरूपात असलेले साहित्य हे डिजिटल स्वरूपात येईल. संगणकावर ते उपलब्ध होईल. सीडी, डीव्हीडी, हार्डडिस्कवर साहित्य उपलब्ध होईल. प्रत्येक पृष्ठाची प्रत स्वच्छ वाचता येईल. पुस्तकांची पुनर्बांधणी करण्यात येईल, हे या योजनेचे निकष आहेत.
या योजनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ५० हजारांचा निधी दिला आहे. आॅक्टोबरपासून डिजिटायझेशन करण्यास सुरुवात झाली आहे. हे काम पुण्यातील एका एजन्सीला दिले आहे. यासाठी निविदाही काढल्या होत्या, असे काळे यांनी सांगितले.
पहिला टप्पा २० लाख पानांचा
टप्प्याटप्प्यांत पानांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात २० लाख पानांचे डिजिटायझेशन करावयाचे आहे. आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन केले आहे. उर्वरित सहा लाख पानांचेही डिजिटायझेशन केले जाणार आहे. संस्थेची वाचकसंख्या जवळपास सहा हजार आहे. यामध्ये नियमित संग्रहालयात येणारे वाचक, संस्थेच्या अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी, याशिवाय दूरवरून येणारे एम.फील., पीएच.डी. व इतर संशोधकांसह देशाबाहेरील संशोधकांचाही समावेश आहे. हे सगळे या योजनेचे लाभार्थी आहेत, असे संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.