सदनिकेच्या व्यवहारात ठाण्यातील चहाविक्रेत्याची १४ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:19 PM2017-12-31T17:19:20+5:302017-12-31T17:39:03+5:30
वागळे इस्टेटमधील एका दाम्पत्याने त्यांची एकच सदनिका दोघांना विकली. ठाण्यातील एका साधारण चहा विक्रेत्याची या व्यवहारात १४ लाख रुपयांनी फसवणूक झाली.
ठाणे : एकच सदनिका दोघांना विकून एका चहाविक्रेत्याची १४ लाख रुपयांनी फसवणूक ठाण्याच्या दाम्पत्याविरूद्ध वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. पैसे घेतल्यापासून आरोपी कुटुंब फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट येथील अंबिका नगरातील एकता संघटन चाळीचे रहिवासी अशोक शंकर भाविक यांचे चहाचे लहानसे हॉटेल आहे. भाविक यांचे चाळीतील घर जुने झाले असून, ते आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी सदनिका विकत घेण्याच्या विचारात होते. त्याच दरम्यान रामचंद्रनगर येथील वैतीवाडीतील श्रद्धा सोसायटीमध्ये ७0१ क्रमांकाच्या खोलीत राहणारे राधेश्याम गोविंद बारिक यांनी त्यांची राहती सदनिका विक्रीस काढली. भाविक आणि बारिक यांच्यात या सदनिकेचा सौदा ठरला. जवळपास २५ लाख रुपयांमध्ये सौदा निश्चित झाल्यानंतर जून २0१५ पासून भाविक यांनी सदनिकेचा मोबदला देण्यास सुरूवात केली. जून २0१५ ते आॅक्टोबर २0१६ या कालावधीत भाविक यांनी धनादेशाद्वारे १४ लाख रुपये राधेश्याम बारिक आणि त्यांच्या पत्नी मिनाती बारिक यांना दिले. दुसरीकडे बारिक दाम्पत्याने त्यांच्या सदनिकेचा व्यवहार आणखी एका ग्राहकाशी केला. या ग्राहकाजवळून बारिक दाम्पत्याने सदनिकेचा पूर्ण मोबदला घेतला. त्यानंतर सदनिकेचा ताबा त्या ग्राहकाला देऊन आरोपींनी पोबारा केला. या व्यवहारात अशोक भाविक यांच्याजवळची संपूर्ण जमा रक्कम गेली असून, सदनिकेचा ताबा दुसर्यालाच मिळाला आहे. एकाच सदनिकेचा दोघांकडून मोबदला मिळवल्यानंतर आरोपी दाम्पत्य फरार झाले. जवळपास वर्षभरापासून त्यांचा ठावठिकाणा नसल्याची माहिती तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी दिली. आरोपी दाम्पत्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचेही फोन बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भाविक यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी राधेश्याम बारिक आणि त्यांची पत्नी मिनाती बारिक यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.