शिवसेनेची १४ सदस्यीय समिती स्थापन
By admin | Published: May 12, 2017 01:33 AM2017-05-12T01:33:28+5:302017-05-12T01:33:28+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असली, तरी त्याचे राजकीय धूमशान आतापासूनच सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असली, तरी त्याचे राजकीय धूमशान आतापासूनच सुरू झाले आहे. या निवडणुकीत थेट लढत शिवसेना-भाजपामध्ये होणार आहे. यामुळे नवीन प्रभागांतील मतांची चाचपणी व राजकीय आढावा घेण्यासाठी शिवसेनेने १४ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपात आयारामांची जुगलबंदी सुरू असून त्यात
शिवसेनेने भाजपाला फोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने अमराठी समाजाला आपलेसे करण्यासाठी कंबर कसली आहे. नवघर, गोडदेव, पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका ते चेना आदी परिसरांत अन्य पक्षांतील दिग्गजांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित भागांत विविध भाषिक समाजांचे प्राबल्य असून त्यातील बहुतांश मतदार भाजपाने हाती राखून ठेवले आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य शैलेश पांडे हे सपत्नीक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. पांडे यांचीपत्नी स्नेहा या माजी नगरसेविका असून त्यांचा विविध भाषिकांसोबत चांगला संपर्क असल्याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचे बोलले जात आहे. याखेरीज, सेनेचा प्रभाव नसलेल्या नवीन प्रभागांत राजकीय आढावा घेण्यासह तेथील मतदारांचा कौल कुणाच्या पदरात पडणार, याची चाचपणी करण्यासाठी शहर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी १४ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी मनसेतून शिवसेनेत आलेले अरुण कदम यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह समितीत उपजिल्हाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, उपमहापौर प्रवीण पाटील, शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालांडे, उपशहरप्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक संदीप पाटील, महिला उपजिल्हासंघटक स्नेहल कल्सारिया, वैशाली खराडे, सुप्रिया घोसाळकर, नगरसेविका नीलम
ढवण, शुभांगी काटियन, पदाधिकारी स्वराज पाटील, सुरेश दुबे यांचा समावेश आहे.
समितीमार्फत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणानुसार उमेदवारी निश्चित केली जाणार असून प्रसंगी युतीचा डाव खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगानेच प्रचाराची दिशा ठरवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.यामुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.