मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून १४ जणांची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: September 27, 2018 09:37 PM2018-09-27T21:37:02+5:302018-09-27T21:49:43+5:30
आपण मुंबई महापालिकेत अधिकारी असल्याचे सांगत तुम्हालाही पालिकेत नोकरीस लावतो, अशी बतावणी करुन ठाण्यातील १४ जणांना १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
ठाणे : मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याच्या आमिषाने १४ जणांची १८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी, राहुल केळकर आणि प्रकाश गायकवाड या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने अटक केली आहे. त्यांना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोपरीतील श्रीकांत जोईल यांना त्यांचे नातेवाईक सुमित जोईल यांच्या ओळखीचे डोंबिवलीतील रहिवासी दत्तात्रेय धुरी हे मुंबई महापालिकेमध्ये एचआर विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. तर, प्रकाश आणि प्रिया गायकवाड या दाम्पत्यासह राहुल केळकर या तिघांनीही मुंबई महापालिकेत वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी केली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांशी ‘सेटिंग’ करून तुमच्या नातेवाइकांना पालिकेमध्ये नोकरीला लावून देऊ, अशी त्यांनी जोईल यांच्याकडे बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाइकांनाही या ‘अधिकाºयांची’ माहिती दिली. त्यानुसार, श्रीकांत जोईल यांचा मुलगा, मुलगी, पुतण्या, इतर नातेवाईक तसेच इतर परिचित आदी १४ जणांकडून रोख आणि बँक ट्रान्सफरद्वारे (आरटीजीएस) १८ लाख पाच हजारांची रक्कम ठाण्याच्या कुंजविहार हॉटेलजवळ स्वीकारली. त्यानंतर, त्यांना महापालिका अधिकाºयांच्या बनावट स्वाक्षºयांचे नियुक्तीपत्र, वैद्यकीय चाचणी करण्यासाठीचे पत्र दिले. आॅक्टोबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. प्रत्यक्षात यातील कोणालाही नोकरीला लावले नाही. या सर्वांनी महापालिकेच्या (बीएमसी) मुख्यालयात चौकशी केली. त्यावेळी अशा नावाचे कोणीही अधिकारी महापालिकेत नोकरी करत नसल्याचीही बाब समोर आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या १४ जणांनी आपले पैसे परत मिळण्यासाठी धुरीसह चौघांकडे पाठपुरावा केला. मात्र, चौघांनीही चालढकल केली. अखेर, श्रीकांत जोईल यांनी याप्रकरणी दत्तात्रेय धुरी, राहुल केळकर, प्रकाश आणि प्रिया गायकवाड या चौघांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी राहुल केळकर आणि प्रकाश गायकवाड यांना, तर २७ सप्टेंबर रोजी धुरीला अटक केली. या चौकडीचे आणखीही साथीदार असून त्यांनी आणखी किती जणांना गंडा घातला, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.