उल्हासनगरात १४ वर्षीय मुलावर ७ ते ८ कुत्र्यांचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू
By सदानंद नाईक | Published: March 17, 2024 07:48 PM2024-03-17T19:48:11+5:302024-03-17T19:48:22+5:30
जखमी मुलावर उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर: कॅम्प नं-१ मधील १४ वर्षाच्या मुलाचे ७ ते ८ कुत्र्याने चावे घेतल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. मध्यवर्ती रुग्णालयात जखमी मुलावर उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, बुद्धकृपा इमारती शेजारी राहणारा अर्पित तिवारी नावाचा १४ वर्षाचा मुलगा शनिवारी सकाळी दूध आणण्यासाठी दुकानात गेला होता. दूध घरी घेऊन येत असतांना ७ तें ८ कुत्र्यांच्या झुंडने अर्पितवर हल्ला करून चावे घेण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावल्याने, अर्पितचा जीव वाचला असलातरी तो गंभीर जखमी झाला आहे.
महापालिकेने एका वर्षात १० हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करूनही कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्यामुळे, आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच दिवसाला ८०० पेक्षा जास्त जणांना कुत्रे चावा घेत असल्याची नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहे. अर्पित यांचे वडीलासह स्थानिक नागरिकांनी भटक्या कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केल्याचे सांगून त्यांना पकडून शहराबाहेर सोडण्याची मागणी होत आहे.