मनसेच्या दणक्यानंतर थकित वेतन मिळालं, 143 रेल्वे कामगारांची दिवाळी साजरी
By महेश गलांडे | Published: November 15, 2020 01:52 PM2020-11-15T13:52:20+5:302020-11-15T14:06:19+5:30
राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर, राज्यात सरकारविरोधात चांगलाचा रोष निर्माण झाला होता.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमुले 143 रेल्वे कामगारांची दिवाळी साजरी झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या 143 कामगारांचे वेतन रेल्वेने थकित ठेवले होते. विशेष म्हणजे दिवाळी असतानाही पगार न झाल्याने कामगारांकडून तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन पुकारण्यात आले. मनसेनं या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, कामगारांना दिवाळीच्या एक दिवस अगोदरच वेतन देण्यात आले.
राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर, राज्यात सरकारविरोधात चांगलाचा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे, सरकारने तातडीने बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन तत्काळ देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कामगारांच्या खात्यावर एक महिन्याचा पगार जमाही करण्यात आला. राज्यातील या एसटी कामगारांप्रमाणेच ठाणे रेल्वे स्थानकात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 143 कामगारांचे वेतन ठेकेदार कंपनीकडून थकविण्यात आले होते. त्यामुळे कामगारांनी आंदोलन पुकारल्यानंतर मनसे रेल्वे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. तसेच, दिवाळीच्या तोंडावर कामगारांना तातडीने पगार देण्याची मागणी केली.
रेल्वे विभागात काम करणाऱ्या १४३ कंत्राटी कामगारांना मिळालं थकीत वेतन; महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा दणका. कामगारांनी मानले राजसाहेबांचे आभार. #कामगारांचीमनसेpic.twitter.com/7s0AS3v47p
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 15, 2020
मनसेच्या दणक्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने कामगारांचे वेतन देण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला दिले. त्यानंतर, कामगारांच भेट घेऊन आजच आपला पगार दिला जाईल, असे आश्वासनही दिले. त्यानुसार, कामगारांना थकित वेतन मिळाल्याने कामगारांची दिवाळी गोड झाली. याबद्दल कामगारांनी पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील पत्र ट्विट करुन माहिती देण्यात आली.