ठाणे पोलीस आयुक्तालयात १४३० देवींची होणार प्रतिष्ठापना
By अजित मांडके | Published: October 14, 2023 06:03 PM2023-10-14T18:03:04+5:302023-10-14T18:03:18+5:30
या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्र उत्सव देखील यंदा मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. त्यानुसार या जल्लोषाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर यंदा ठाणे पोलीस आयुक्तालयात एकूण १४३० सार्वजनिक आणि खाजगी देवींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात रास गरबा, दांडिया आणि डीजेचा आवाज, त्यात गाण्याच्या तालावर ठेका धरणारे तरुण आणि तरुणी, विविध वेशभूषा आदीचे आविष्कार पाहायला मिळणार आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवात एकच धूम आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे. यंदा ठाण्यात ५९५ सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि ८३५ खाजगी दुर्गा मातेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे. तर ६६ सार्वजनिक घटांची स्थापना यंदा करण्यात येणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्याने या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलिसांचा ४ हजार ४२९ उच्च पोलीस अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त,वपोनि, पोलीस निरीक्षक, अहाय्यक पोलीस निरीक्षक महिला आणि पुरुष असा जम्बो बंदोबस्त नऊ दिवस तैनात राहणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्त.. गस्ती पथके तैनात
नवरात्रोत्सव सणाला यंदा राजकीय झालर लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. मध्यरात्री पर्यंत चालणाºया गरबा नृत्य आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलीसांचा ४ हजार २२९ जणांच्या मनुष्यबळाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस उच्च अधिकारी, पोलीस अधिकारी, महीला पोलिस अधिकारी, महीला पोलिस कर्मचारी, स्थानिक पोलिस ठाण्याची आणि परिमंडळ पोलिसांची विशेष गस्ती पथके गस्तीवर राहून परिस्थीती नियंत्रणात ठेवणार आहे. सोबत सीसी टिव्ही, ड्रोनची करडी नजर राहणार आहे.
व्हॉट्सअप,सोशल मीडियावर करडी नजर
ठाणे पोलिसांनी नवरात्रोत्सवात बंदोबस्ताची रंगीत तालीम करून प्रत्येक पोलीस ठाणे सज्ज आहे. तर ठाणे पोलिसांची नजर व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर करडी नजर राहणार आहे. गदीर्ची ठिकाणे, आणि नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या पाच परिमंडळ साजरा होणाºया नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी ठाणे पोलिसांचा जंगी आणि चोख बंदोबस्ताचे नियोजन सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यंदा नवरात्र उत्सव जल्लोषाल साजरा केला जाणारा असून यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणे पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत. उत्सव शांततेत व्हावा यासाठी ठाणे पोलिसांसोबतच इतर अतिरिक्त मनुष्यबळाची कुमुक देखील बंदोबस्तात समाविष्ट करण्यात आलेले आहे.
अनिल वाघमारे (सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा)
असा आहे ठाणे पोलिसांचा नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त
अप्पर पोलीस आयुक्त - ४
पोलीस उपायुक्त - ८
सहाय्यक पोलीस आयुक्त - १४
पोलीस निरीक्षक - ११५
सपोनि, पोउपनि - २८७
महिला सपोनि, पोउपनि - १९
पोलीस अंमलदार - २,५६४
महिला पोलीस अंमलदार - ७१८
होमगार्ड-पुरुष - ५००
होमगार्ड महिला - २००
एसआरपी - ३ कंपन्या
शीघ्र कृतीदल - २ कंपन्या