तीन तालुक्यांतून १४४ टन काजू निर्यात
By admin | Published: May 9, 2016 01:52 AM2016-05-09T01:52:36+5:302016-05-09T01:52:36+5:30
कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेल्या ड्रायफ्रूट काजू व त्याचे बी याची जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून
जव्हार : कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेल्या ड्रायफ्रूट काजू व त्याचे बी याची जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून १४४ टन निर्यात झाल्याचे व्यापारी सुशील सहाने यांनी लोकमतला सांगितले.
जव्हार हे संस्थान कालीन शहर आहे, येथील श्रीमंत राजे यांनी आपल्या महलाच्या २० ते २५ एकरात काजूची बागायत लावली आहे. त्यामुळे काजूचे दरवर्षी जवळ जवळ ५००० किलोचे उत्पादन या एकट्या बागेतून निघत असते. याकरीता काही व्यापारी या बागेची सिझनपूर्वीच बोली करून माल खरेदी करतात.
तालुक्यातील खेडोपाड्यात प्रकल्प कार्यालयामार्फत फळबाग योजनेतून तसेच बायफ मित्र व इतर संस्थांच्या मदतीने काजूची हजारो रोप देऊन बाग तयार करण्यात आलेल्या आहेत, यातूनही भल्या मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन निघते, त्यामुळे येथील शेतकरी आपल्या छोटेखानी बागेतूनही बरेच उत्पादन घेतात.
दरवर्षाप्रमाणे यंदाच्या सिझनला काजू बी चे उत्पादन चांगले झालेले असल्यामुळे शेतकरी व व्यापारी आनंदात आहेत. छोटी बी ८० ते १०० रू किलो तर मोठे बी ९५ ते १२० मध्ये विकली जात असल्याने भावही चांगला मिळतो आहे. (वार्ताहर)