१४७ कोटींचे तेल जप्त
By admin | Published: October 25, 2015 01:08 AM2015-10-25T01:08:14+5:302015-10-25T01:08:14+5:30
विविध देशांतून आयात झालेल्या तेलाच्या बिल रेकॉर्ड्समध्ये ताळमेळ नसल्याने ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने शहापूरमधून अंदाजे १४७ कोटींचा विविध कंपन्यांचा तेलसाठा
ठाणे : विविध देशांतून आयात झालेल्या तेलाच्या बिल रेकॉर्ड्समध्ये ताळमेळ नसल्याने ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने शहापूरमधून अंदाजे १४७ कोटींचा विविध कंपन्यांचा तेलसाठा शुक्रवारी मध्यरात्री जप्त केला आहे. त्या आयात बिल रेकॉर्ड्समध्ये ताळमेळ दिसून आल्यास तो साठा परत केला जाईल, अन्यथा तो शासनाकडे जमा होऊ शकतो, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली.
शहापूरमधील दामणेगावात लिबर्टी कंपनीचा आॅइल प्रोसेसिंग प्लांट आहे. तेथे पाम, वनस्पती अशा विविध प्रकारच्या नामांकित कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात तेलसाठा असल्याची माहिती ठाणे जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, विभागाच्या भरारी पथकाने तेथे शुक्रवारी रात्री त्या तेलाच्या आयात बिलांचे रेकॉर्ड्स तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा, त्यांना त्यामध्ये ताळमेळ नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, तेथील २९ हजार ३००.४१ मेट्रीक टनाचा तेलसाठा जप्त केला असून, त्याची किंमत अंदाजे १४७ कोटी आहे. संबंधित कंपनीला याबाबत नोटीस पाठवून त्या आयात तेलसाठ्याचे बिल रेकॉडर््स तपासले जाणार आहे. त्यामध्ये ताळमेळ आढळल्यास हा साठा त्या कंपनीला परत करण्यात येईल, अन्यथा तो साठा शासनाकडे जमा करण्यात येईल, अशी माहिती ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहन नळदकर यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)