ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १४७ घरांची पडझड, मुरबाडमधील १२३
By सुरेश लोखंडे | Published: April 14, 2023 06:10 PM2023-04-14T18:10:58+5:302023-04-14T18:11:24+5:30
अवकाळी पावसाने राज्याच्या अन्य जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे.
ठाणे : अवकाळी पावसाने राज्याच्या अन्य जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील गांवखेड्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेसह वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या १४ दिवसांत तब्बल १४७ घरांची अशंत: पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांनी कहर केला आहे. काही काळ ढगाळ वातावरण निवळल्यानंतर जीव घेण्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे, तर सायंकाळी ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या दोन्ही तालुक्यांना वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. दरम्यान या दोन्ही तालुक्यात दीड मीमी.पाऊस पडला. मात्र वादळामुळे गावखेड्यातील घरांवरील पत्रे उडाले, गवताचे छप्पर असलेल्या घरांना या वादळामुळे फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील १२३ घरांचे नुकसान असून शहापूर या दुर्गम भागातील २४ घरांच्या नुकसानीची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
फळझाडांसह भाजीपाल्यालाही फटका
मुरबाडच्या दहिगाव परिसरातील जाविद शेख यांच्या एक एकरमधील ९६ आंब्यांसह ५२ नारळाच्या झाडांना वादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे तब्बल दोन लाखांच्या नुकसानीचा अंदाज शेख यांनी व्यक्त केला आहे. फार्म हाऊससह भाजीपाल्याचे, भेंडीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या वादळी वाऱ्यांपासून होणाऱ्या नुकसानीसह ग्रामीण भागात पाणी टंचाईही जीवघेणी ठरत आहे. त्यात रोज ४० ते ४२ अंशसेल्शीअस तापमानाला जिल्ह्यातील ग्रामस्थ तोंड देत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे शारिरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी...
जिल्ह्यातील या उष्णतेच्या लाटेवर मात करण्यासाठी उपाययोजना करून काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षासह महापालिका, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. यामध्ये तहान लागलेली नसली, तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी टोपीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान झाकावी, आदी उपाययोजना सुचवविल्या आल्या आहेत.