ज्येष्ठ नागरिक महिलेस १.४७ लाखांचे वीजबिल, महावितरणचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 07:38 AM2020-09-17T07:38:46+5:302020-09-17T07:39:04+5:30
चौधरी यांच्या घरी त्या, पती गजानन व मुलगा असे तिघेच राहतात. एलईडी लाइट, एक वॉशिंग मशीन, एक एसी इतकाच त्यांच्या घरात विजेचा वापर आहे.
डोंबिवली : एमआयडीसीतील मिलापनगरमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक गौरी चौधरी यांना महावितरणने एक लाख ४७ हजार २५० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसला आहे.
चौधरी यांच्या घरी त्या, पती गजानन व मुलगा असे तिघेच राहतात. एलईडी लाइट, एक वॉशिंग मशीन, एक एसी इतकाच त्यांच्या घरात विजेचा वापर आहे. त्यामुळे इतके वीजबिल आले कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या बिलाबाबत गजानन यांनी महावितरणच्या कार्यालयात चौकशी केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना हे बिल योग्य असून, ते तीन समान हप्त्यांत भरा, असे सांगितले आहे. परंतु, पहिला हप्ताच ४९ हजारांचा असून, त्यांना तीन समान हप्त्यांत बिल भरणे शक्य नाही. मात्र, बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित होईल, या विवंचनेत चौधरी कुटुंब सापडले आहे.
चौधरी यांच्याप्रमाणेच मिलापनगरात राहणारे ज्येष्ठ नागरिक अजय देसाई यांनाही ७० हजार १४० रुपयांचे वीजबिल आले आहे. तेही बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. त्यांनाही तीन समान हप्त्यांत बिल भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांनाही बिल भरणे शक्य नाही. हे जरी सहा महिन्यांचे सरासरी बिल असले, तरी सरासरी येणारी ठरावीक रकमेची बिले त्यांनी आतापर्यंत भरली आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याणमधील भाजप आमदारांचे वीजबिल कमी करण्यात आले होते. तोच न्याय सामान्य नागरिकांच्या वाढीव बिलांबाबत का दिला जात नाही, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे. वाढीव बिलांच्या विरोधात भाजप, शिवसेनेकडून आंदोलने करण्यात आली. तरीही, महावितरणने वाढीव बिलांबाबत दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना ‘शॉक’च बसला आहे.