अर्ध्या तासात झाले १४९ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:38 AM2019-06-15T00:38:23+5:302019-06-15T00:38:43+5:30
बदलापूर पालिका : २६ कोटींची गरज
बदलापूर : नवनियुक्त नगराध्यक्षांच्या कार्यकाळातली पहिली विशेष सभा बुधवारी झाली. यावेळी तब्बल १४९ विषय अवघ्या अर्ध्या तासात मंजूर करण्यात आले. विक्र मी वेळेत मंजूर झालेल्या या विषयांसाठी जवळपास 26 कोटी रूपये निधींची आवश्यकता आहे. मात्र विषयांच्या तरतुदीप्रमाणे निधीचा विनियोग केला जाईल असे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सभेत स्पष्ट केले आहे.
गेल्यावर्षी अशाच प्रकारे मोठी सभा झाली होती. त्यावेळी जवळपास ४० कोटी रूपयांची तरतूद या सभेसाठी आवश्यक होती. मात्र तशी तरतूद नसल्याने आणि अर्थसंकल्पातील विविध विषयांसाठी तरतूद संपल्याने तूट निर्माण झाली असल्याची बाब त्यावेळी मुख्याधिकारी बोरसे यांनी निदर्शनास आणून देत सभा घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे ती सभा गाजली होती. नंतर ती सभा सत्ताधाऱ्यांना गुंडाळावी लागली. तशाच प्रकारची विशेष सभा झाल्याने ही सभाही वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सभेला सुरूवात झाली. काही विषयांचे वाचन करून सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात एकूण १४९ विषयांना मंजुरी देण्यात आली. विक्रमी वेळेत मंजूर झालेल्या या विषयांची चर्चा शहरात रंगली होती. या सभेत पेव्हर, गटार, चौक, रस्ते सुशोभीकरण, उद्यान दुरूस्ती, त्यातील खेळणी, व्यायाम साहित्य अशा किरकोळ विषयांचा समावेश असल्याने शहरातील नागरिक आक्षेप घेत होते.
पाहणीनंतरच प्राकलन तयार करणार
सभेच्या सुरूवातीलाच बोरसे यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. विषयांना मंजुरी मिळाली असली तरी स्थळ पाहणी करत विषयांची प्राकलने तयार केली जातील असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या ज्या विषयांच्या नावाने तरतुदी असतील त्याचप्रमाणे खर्च केला जाईल असेही ते म्हणाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दौलतजादावर मुख्याधिकाºयांनी अंकुश ठेवल्याची चर्चा आहे.