१४९० इमारती धोकादायक मुंब्य्रातील संख्या अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:44 AM2020-05-26T00:44:52+5:302020-05-26T00:45:13+5:30
यादी जाहीर; मनपाच्या निर्णयाकडे लक्ष
ठाणे : एकीकडे शहरातील कोरोनाचे संकट भीषण होत असतांना दुसरीकडे येत्या काही दिवसांत येणाऱ्या पावसाळ्यात धोकादायक इमारतींची समस्यादेखील आ वासून उभी आहे. एकट्या मुंब्रा विभागात १४९० इमारती या धोकादायक तर १४ इमारती या अतिधोकादायक असल्याचेही महापालिकेच्या यादीवरून दिसत आहे. त्यामुळे महापालिका त्या खाली करणार की, अन्य काही पर्याय निवडणार, याकडे लक्ष लागले आहे.
शहरात दोन महिन्यांपासून लॉकडाउन असतांनाही कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांची मागणीही वाढली आहे. दुसरीकडे येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्याच्या या कालावधीत नालेसफाई, गटारांची सफाई करण्याबरोबरच मागील काही वर्षांत धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
१०८९ इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीची गरज
च्धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने आता नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सी १- अतिधोकादायक, सी २ अ इमारत तोडून पुन्हा उभी करण्यास शक्य, आणि सी ३ ब- तत्काळ दुरुस्त करता येणे शक्य, तर सी ३ किरकोळ दुरुस्तीला परवानगी देता येणे शक्य, अशा इमारतींचा समावेश असून महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी वेबसाइटवर टाकली आहे.
च्ज्यामध्ये सी-१ मध्ये १४ इमारतींचा समावेश आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी इमारत खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर सी २ अ मध्ये ५९, सी २ ब मध्ये ३२५ इमारतींचा समावेश आहे.
१४ इमारती अतिधोकादायक :
आजघडीला मुंब्य्रात १४९० इमारती या धोकादायक स्थितीत असून १४ इमारती या अतिधोकादायक स्थितीत आहेत. २०१२ मध्ये शीळफाटा येथे झालेल्या लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेत ७४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेनंतर महापालिकेने धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे.