१४ एप्रिल २०१८ पर्यंत डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणार?, केडीएमसीच्या उपअभियंत्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 02:09 PM2017-10-12T14:09:38+5:302017-10-12T14:10:02+5:30
प्रशिक सामाजिक संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवली शहरात का लावला जात नाही? ही मागणी करत केडीएमसीच्या उपविभागीय इमारतीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला.
डोंबिवली- प्रशिक सामाजिक संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवली शहरात का लावला जात नाही? ही मागणी करत केडीएमसीच्या उपविभागीय इमारतीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. त्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांचे निवदेन मोर्चेक-यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत १४ एप्रिल २०१८ पर्यंत बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येइल असे आश्वासन त्यांनी दिले.
'बाबासाहब के सन्मान मे फिर से मैदान मे' या घोषवाक्याखाली निषेध मोर्चा काढण्यात आला होता. डॉ. आंबेडकरांचा प्रश्न आला की तो सहजासहजी सुटत नाही, त्यासाठी आंदोलनं का करावी लागतात, असा सवाल यावेळी करण्यात आला. महापालिकेत ठराव संमत होऊनही अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात या प्रस्तावाची अंमलबजावणी का केली जात नाही? असा सवाल संतप्त मोर्चेक-यांनी केला. महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधा-यांची ही नामुष्की असून ती खंत व्यक्त करण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आल्याचे उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष मिलिंद साळवे यांनी सांगितले. याच मागणीसाठी ३१ ऑगस्ट २०१५ मध्ये याच ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत तातडीने स्थायीच्या सभेत या मागणीसाठी निधी मंजूर केला होता, तो निधी गेला कुठे? त्याचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. तेव्हापासून संस्थेचे शिष्ठमंडळ वेळोवेळी महापालिका अधिका-यांच्या भेटी घेत आहे, पण त्यासंदर्भात कोणीही काहीही बोलत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, युवक आघाडी, झोपडपट्टी, आणि रिपब्लिकन सेना आदींनी पाठींबा दर्शवला. या आंदोलनाला शहरातील आंबडेकरी अनुयायांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.