मीरा भाईंदर मधील १५ कोटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी दिड कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:52 PM2022-03-31T21:52:03+5:302022-03-31T21:52:12+5:30
मे महिन्यात बांधकामाला होणार प्रत्यक्षात सुरुवात
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात महाराष्ट्र शासनाच्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने' अंतर्गत सांस्कृतिक भवन , विपश्यना केंद्र व बहुउद्देशीय केंद्र बांधण्याच्या १५ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात दिड कोटींचा निधी शासनाने दिला आहे . येत्या मे महिन्यात ह्या बहुउद्देशीय केंद्राच्या कामास सुरवात होणार आहे .
मीरारोडच्या मौजे घोडबंदर येथे सर्वे नंबर २२३ या ठिकाणी सांस्कृतिक भवन , विपश्यना केंद्र व बहुउद्देशीय केंद्र बांधण्याच्या कामाची मागणी गेल्या ९ वर्षां पासून राज्य शासना कडे चालवली होती . गेल्या भाजपा - सेने युती सरकारच्या काळात विविध अडचणींमुळे हे काम मार्गी लागू शकले नाही. महाविकास आघाडी शासन आल्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तीन बैठका झाल्या . १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आधी या कामाला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी सरकारकडे पाठपूरावा सुरु होता. आज ३१ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या कामाला मंजुरीचे लेखी आदेश प्रसिद्ध केले आहेत अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन साठी १५ कोटी ५९ लाख ६५ हजार ५२३ किमतीचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी सादर झाला होता. सरकारने १५ कोटी खर्चाला मान्यता दिली आहे. तर उर्वरित ६० लाख इतका निधी आमदार निधीतून 'विशेष बाब' म्हणून मंजूर केला गेला आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने दीड कोटीचा निधी मंजूर केला असून तो मीरा भाईंदर महापालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता एप्रिल महिन्यात मीरा भाईंदर महापालिकेकडून हे सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर मे महिन्यात प्रत्यक्षात सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे असे ते म्हणाले . हे काम मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री धनंजय मुंडे यांचे आ. सरनाईक यांनी आभार मानले आहेत.