महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 07:34 PM2019-07-23T19:34:03+5:302019-07-23T20:03:31+5:30
डोंबिवली शहर शून्य भारनियमन मुक्त असताना, तसेच येथील ग्राहक हा राज्यामध्ये सर्वाधिक वीज बील सुरळीत भरणारा असूनही काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत
डोंबिवली - डोंबिवली शहर शून्य भारनियमन मुक्त असताना, तसेच येथील ग्राहक हा राज्यामध्ये सर्वाधिक वीज बील सुरळीत भरणारा असूनही काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील एकही प्रभाग असा नाही की जेथे वीजेची समस्या नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचे अल्टीमेटम देण्यात येत असल्याचे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
सोमवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी भाजपाचे नगरसेवक एकत्र आले होते. पक्षाच्या बैठकीआधी त्यांनी सगळयांनी राज्यमंत्र्यांची भेट घेत व्यथा मांडली. त्यानूसार चव्हाण यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्यासमवेत चर्चा केली. त्यावेळी झालेल्या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, नीलेश म्हात्रे संदीप पुराणिक, राजन आभाळे, मंडल शहर अध्यक्ष संजीव बीडवाडकर, रवीसिंग ठाकूर, अमित कासार यांच्यासमवेत अन्य नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून म्हात्रे नगर प्रभाग क्र. 67 व सभोवतालच्या परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येचे पुर्णत: निराकरणासाठी पेडणेकर यांनी ते स्वत: प्रचंड त्रस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर जीवनप्रभा सोसायटीचे रहिवासी विराज सिन्हा, विनीत सदनच्या स्मिता राजे, त्रिवेणी इमारतीचे ए. डिमेलो, नवसाई प्रसाद आदी सोसायट्यांमधील दक्ष नागरिकांनी त्यांना भेडसावणारा त्रास सर्वांसमोर सांगितला. त्यावर बिक्कड यांनी सामस्या आहेत, हे मान्य करत नागरिक त्रस्त असून लवकरच सगळयांना दिलासा मिळेल असे आश्वासन दिले.
आगामी दहा दिवसांत रिंगरुट चे काम पूर्ण होणार असून साधारणत: पंधरवड्यात शहरातील बहुतांशी ठिकाणच्या महावितरण संदर्भातील समस्या सुटतील असे ते म्हणाले. विविध प्रभागांमध्ये लावण्यात आलेले निकृष्ट दजार्चे डी. ओ. व कनेक्टर सप्टेंबर 2019 च्या शेवटपर्यंत तातडीने बदलून उच्च दजार्चे डी. ओ. व कनेक्टर तसेच इतर काही आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले. तसेच महावितरणच्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्याची सूचना केली.