पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १५ जणांना चावा
By admin | Published: May 27, 2017 02:15 AM2017-05-27T02:15:31+5:302017-05-27T02:15:31+5:30
शहराच्या पश्चिम भागातील रेतीबंदर व वालधुनी परिसरांत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने १५ जणांचा चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील रेतीबंदर व वालधुनी परिसरांत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने १५ जणांचा चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हा कुत्रा घरात घुसून चावा घेत आहे. त्याला पकडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.
रेतीबंदर परिसरातील तानकी चाळीत राहणारा तीन वर्षांचा मोहंमद हुसेन हा घराच्या बाहेर खेळत होता. त्याला भटक्या कुत्र्याने येऊन चावा घेतला. याच भागात राहणाऱ्या अलिना चांदू या सात वर्षांच्या मुलीला त्याच कुत्र्याने चावा घेतला. नवीद शेख या सोळावर्षीय तरुणाला घरात शिरून चावा घेतला. रेतीबंदर येथे राहणाऱ्या संजय यादव या तरुणाच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला आहे. मौलवी कम्पाउंडमध्ये राहणाऱ्या जहांगीर शेख या तीसवर्षीय तरुणाच्या पायाला कुत्र्याने जोराचा चावा घेतला आहे. घराबाहेर बसलेल्या पंचावन्नवर्षीय गौसिया फक्की यांच्या पायाला कुत्रा चावला. ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अब्दुल रेहमान कामली यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला.
वालधुनी परिसरातील इम्रान शेख या आठ वर्षांच्या मुलाच्या पाठीला व मांडीला कुत्र्याने जबर चावा घेतला आहे. याच परिसरात राहणारी खुशनूर खान ही नऊ वर्षांची मुलगीही कुत्र्याच्या चाव्यात जखमी झाली आहे. या परिसरातील कुत्र्याने एका बकरीच्या तोंडाला चावा घेऊन तिला जखमी केले आहे. तसेच दोन कोंबड्यांवर डल्ला मारला आहे.
जखमी झालेल्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.