ठाण्यातील १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
By admin | Published: June 25, 2017 04:04 AM2017-06-25T04:04:38+5:302017-06-25T04:04:38+5:30
कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे.
सुरेश लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. यात १४२ कोटी ७६ लाखांच्या पीककर्जासह २९ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ७२९ शेतकरी आहेत. त्यांना ७९ कोटी ५० लाखांची कर्जमाफी मिळाली.
यात १३ हजार १७४ शेतकऱ्यांचे ६२ कोटी २१ लाखांचे पीककर्ज माफ झाले आहे. तर १७ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा लाभ दोन हजार ५५५ शेतकऱ्यांना झाला आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांत एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सुमारे पाच हजार २५८ मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या सुमारे ७३८ मोठ्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे
ठाणे व पालघर जिल्ह्यात भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पीकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. भात पीकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहेत. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.