गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य संकलित, थर्माकॉलचा वापर शुन्य
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 6, 2022 05:05 PM2022-09-06T17:05:52+5:302022-09-06T17:09:08+5:30
थर्माकॉलचा वापर शून्य तर अविघटनशील घटकांचे प्रमाण कमी
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ठाणेकरांनी यंदा थर्माकॉलचा शून्य वापर केल्याचे तसेच, अविघटनशील घटकांचा कमीत कमी वापर केल्याचे आढळून आले आहे. गणेशोत्सव काळात सुरू असलेल्या निर्माल्य संकलन मोहिमेत समर्थ भारत व्यासपीठाने वरील निरीक्षण नोंदविण्यात आले. तसेच, या मोहिमेत गौरी गणपती विसर्दनावेळी १५ टन निर्माल्याचे तर आतापर्यंत ३७ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे.
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने गणेशोत्सव काळातील निर्माल्याचे संकलन करणे व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्या वर्षात पदार्पण केले. यंदा दिड दिवसाच्या गणपती विसर्जनात जवळपास १० टन तर पाचव्या दिवसांच्या गणपती विसर्जनात १२ टन तर गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. तलावांचे शहर असलेल्या ठाण्याने गणपती काळातील निर्माल्य व्यवस्थापनासाठी देखील गेल्या बारा वर्षांपासून महानिर्माल्य व्यवस्थापन अभियान राबविले आहे. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांकडून निर्माल्य व सजावटीचे साहित्य संकलित केले जाते. विसर्जन घाटावर तैनात करण्यात आलेल्या वाहनांमध्ये या निर्माल्याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण केले जाते. वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्यासपीठाच्या संयुक्त कचरा व्यवस्थापनावर पाठवला जातो. जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते तर अजैविक कच-यात असलेल्या प्लास्टीक, कागद, पुठठा, काच, कागद सारखे घटक देखील संस्थेच्या प्रकल्प पुर्ननिर्माणमध्ये शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठवले जातात.
गेल्या १२ वर्षापासुन समर्थ भारत व्यासपीठ हा उपक्रम राबवित आहे. शहरातील सफाई सेवक महिला व संस्थेचे कार्यकर्ते गणेशोत्सव अधिक पर्यावरण पुरक व्हावा यासाठी जन जागृती करत असतांनाच प्रत्यक्ष निर्माल्य संकलन व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लागावी म्हणून एक महिना या महानिर्माल्य अभियानात कार्यरत असतात. दिड दिवस, पाच दिवस आणि सहा दिवसांच्याच्या विसर्जनात जवळपास ३७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. कोविड नंतर यंदाचा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे निर्मालयाचे प्रमाण यंदा वाढले आहे. थर्माकोलचा वापर शून्.य तर प्लास्टीकचा वापर ८० टक्के कमी झालेला यावर्षी दिसला अशी माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली. संपुर्ण गणेशोत्सवात किमान १०० टन निर्माल्य संकलित होईल असा अंदाज संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्याचे देखील शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाईल असा निर्धार समर्थ भारत व्यासपीठाने व्यक्त केला आहे.