डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधून १५० शिवसैनिक आयोध्येला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:08 PM2018-11-22T17:08:46+5:302018-11-22T17:44:24+5:30
चलो अयोध्याचा नारा देत येथील १५० शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी रेल्वेने आणि विमानाने दिल्ली येथे गुरूवारी रवाना झाले.
डोंबिवली - चलो अयोध्याचा नारा देत येथील १५० शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी रेल्वेने आणि विमानाने दिल्ली येथे गुरूवारी रवाना झाले. शुक्रवार, शनिवारी आयोध्येत पक्षाने दिलेली काम करून रविवारी प्रत्यक्ष दर्शन, महाआरती करून सोमवारी परतीचा प्रवास असल्याची माहिती शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.
अयोध्येत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जेव्हा महाआरती करतील त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रमुख मंदिरांमध्ये शिवसैनिक घंटानाद, आरती करणार असल्याचे ते म्हणाले. डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागामध्ये प्रमुख सहा मंदिरांमध्ये प्रत्येक ठिकाणी ४०० शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समुह एकत्र येणार आहे. ते संध्याकाळी ६ ते ८ या कालावधीत आरती करतील, आयोध्याच्या राम कथा निरूपण करतील. आणि एकप्रकारे भक्तीमय वातावरण निर्माण करून शहरात भगवी लाट आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मोरे म्हणाले. शहरातील फडके रोड, बाजीप्रभु चौक, पिंपळेश्वर, कल्याण शीळ रोड,गावदेवी मंदिर आदी सर्व ठिकाणी, तसेच ठाकुर्लीतही महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे अयोध्येत आरती केल्यानंतर तातडीने सगळयांना सूचित करण्यात येणार असून त्यानंतरच सर्वत्र आरतीचा उपक्रम संपन्न होणार असल्याचे आदेशीत करण्यात आले आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व पोलिस, वाहतूक पोलीस परवानग्या काढण्यात याव्यात. स्थानिक पदाधिकारी, शाखा प्रमुख, विभागप्रमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर उपक्रम यशस्वी होतील असा विश्वास मोरेंनी व्यक्त केला.