अंतर्गत मेट्रो मार्ग १५०० कोटींचा, जर्मन बँकेकडून घेणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:10 AM2018-07-03T04:10:50+5:302018-07-03T04:10:59+5:30
ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रोने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून महापालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या निधीसोबतच जर्मन बँकेची मदत घेण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे : ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रोने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून महापालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या निधीसोबतच जर्मन बँकेची मदत घेण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रोचा खर्च सुमारे १५०० कोटींच्या आसपास असल्याने पालिकेने हे पाऊल उचलले आहे. मेट्रोच्या या मार्गात २२ स्थानके असणार असून २५ किमीचा हा मार्ग असणार आहे. तसेच मुख्य मेट्रोलासुद्धा ही कनेक्ट केली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास भविष्यात सुखकारक होणार आहे.
अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वेस्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह यासह संपूर्ण शहरास फायदेशीर ठरेल, अशी मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. या मार्गिकेत २२ स्थानके असणार आहे.
शहरातील २५ किमीचा हा मार्ग असणार असून ठाणे स्टेशनपासून ही मेट्रो बाहेर पडणार आहे. यासाठी सुमारे १५०० कोटींच्या खर्चासाठी राज्य शासन, केंद्र शासनाकडेदेखील निधी मागितला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी जर्मन बँकेचे प्रतिनिधी पालिकेत येऊन गेले. त्यांनी या मार्गाची पाहणी केली असून हा मार्ग किफायतशीर आहे किंवा नाही, याची चाचपणी केली. कर्ज द्यायचे अथवा नाही, याचा अहवाल काही दिवसांत देणार आहेत. त्यानंतर, पालिका यासंदर्भातील प्रस्ताव महासभा आणि दुसरीकडे केंद्राकडेदेखील अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे. यानंतर मेट्रोचा मार्ग मोकळा होणार आहे.
बांधकामे बाधित होणार
या मार्गात एक हजाराहून अधिक बांधकामे बाधित होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. सुरुवातीच्या स्थानकापासून ३० मीटर खाली म्हणजेच सिडको ते नवीन रेल्वेस्टेशनपर्यंतचा या मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार आहे. परंतु, त्यापुढील मार्ग हा रस्त्याच्या वरून जाणार आहे.