कोल्हापूरसाठी १,५००, तर धुळ्यासाठी १,००० भाडे; खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची बससेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 11:35 PM2020-11-12T23:35:36+5:302020-11-12T23:36:03+5:30
ऐन दिवाळीत प्रवासभाड्यात वाढ ; प्रवाशांना भुर्दंड
- जितेंद्र कालेकर
ठाणे : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवासी भाड्यामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे भरडलेल्या प्रवाशांवर सणासाठी आपले गाव गाठणेही मोठे दिव्य झाले आहे. एरव्ही ६०० रुपये असलेले कोल्हापूरचे भाडे आता दीड हजार रुपये झाले आहे. धुळेकरांना सातशेऐवजी आता एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. एसटीच्या साध्या आणि शिवशाही (वातानुकूलित) बसपेक्षाही हे भाडे जास्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
ठाण्यातून कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक, शिर्डी आणि धुळ्याकडे जाणारा मोठा प्रवासीवर्ग आहे. सध्या शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. गेले सात महिने लॉकडाऊनमध्ये अडकलेले चाकरमानी आता आपापल्या गावी जात आहेत. त्यातही दिवाळी सण असल्यामुळे एसटीसह खासगी बसेसलाही प्रवाशांची मोठी मागणी आहे.
एसटीच्याही सध्या मर्यादित गाड्या असल्याने त्यांचे आरक्षण मिळणे कठीण होते. शिवाय, लांब पल्ल्यांसाठी एसटीच्या वातानुकूलित आणि लक्झरी बसेसही कमी आहेत. त्यामुळेच प्रवासी खासगी बसेसचा आधार घेतात. मधल्या काळात ट्रॅव्हल्स बसलाही प्रवासी नव्हते. डिझेलचेही भाव वाढले. शिवाय, कर्जाचे हप्ते, टोलमध्येही झालेली वाढ अशा सर्व पार्श्वभूमीवर प्रवास भाड्यात वाढ करावी लागल्याचे ट्रॅव्हल्सचालक सांगतात.